

सातारा : तीन वेळचा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या सोलापूरच्या पैलवान महेंद्र गायकवाडने हिंदकेसरीलाही गवसणी घातली. अंतिम लढतीमध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ जखमी झाल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे महेंद्रला विजयी घोषित करण्यात आले. महेंद्रने मानाची गदा पटकावताच स्पर्धेचा आखाडा थरारला. दरम्यान, महिला हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत हरियाणाच्या काजल डोचक हिने गदा पटकावली.
कुस्तीमहर्षी पै. साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठान सातारा व तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने छत्रपती शाहू स्टेडियम येथे 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रविवारी संपला. यावेळी जागतिक कुस्ती संघटनेच्या अध्यक्षा, किर्गीस्तानच्या माजी उपपंतप्रधान सुलताना बेकोवा, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. मनोज घोरपडे, उद्योजक संग्राम घोरपडे, अजिंक्य सगरे, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे अध्यक्ष हिंदकेसरी संजयकुमार, रामाश्रय यादव, दीनानाथ सिंह, महाराष्ट्र अध्यक्ष नितीन बारणे, सचिव गौरव रोशनलाल, हिंदकेसरी अर्जुन अवाडिया, मोहन खोपडे, कुस्ती महर्षी साहेबराव पवार, दीपक पवार, सुधीर पवार, ऑलिम्पिकवीर अशोक गर्ग, अर्जुनवीर पै. काका पवार, महाबली सतपाल आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज मोहोळ याने सेमी फायनलमध्ये एनसीआरच्या पै. रजत राहुल याला आस्मान दाखविले. तर महेंद्र गायकवाड याने दिल्लीचा पै. अनिरुद्ध कुमार याला पराभवाची धूळ चारली होती. अंतिम लढतीत पृथ्वीराज व महेंद्र एकमेकांना भिडले. लढत सुरू होताच दोघांनीही एकमेकाला आजमावत शड्डू ठोकला.
सुरुवातीपासूनच महेंद्रने आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, भारंदाज डाव टाकताना त्याच्याकडून पृथ्वीराजचा हात दुखावला. तो जखमी झाल्यामुळे ही लढत थांबविण्यात आली. डॉक्टरांनी पृथ्वीराजच्या हाताची तपासणी केली. तो त्यानंतरही आखाड्यात उतरला. मात्र, त्याच्या हातातून वेदना येऊ लागल्या. त्यामुळे पृथ्वीराजने माघार घेतली. परिणामी, महेंद्र गायकवाडला हिंदकेसरी घोषित करण्यात आले.
महिला हिंदकेसरीसाठी पै. काजल डोचक (हरियाणा) व पै. खुशी दलाल (दिल्ली) यांच्यात लढत झाली. त्यामध्ये काजल हिने खुशीला सुरुवातीला सलग दुहेरी पट टाकत 4 गुण मिळवले. त्यानंतर खुशीने दुहेरी पट टाकून 2 गुण मिळवले. त्यानंतर काजलने तिला चितपट करत गदा उंचावली.