

सातारा : देशभर गाजत असलेल्या डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एसआयटी नेमण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिल्यानंतर या एसआयटीची सूत्रे महाराष्ट्राच्या पोलिस दलात लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणार्या डॅशिंग आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे देण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या आदेशानुसार तेजस्वी सातपुते यांनी सातार्यात येऊन सुमारे तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली. तेजस्वी सातपुते यांनी यापूर्वीच सातार्यात पारदर्शक कारभार केल्याने त्यांच्या नियुक्तीने सत्य उजेडात येईल, अशी खात्री सातारा जिल्हावासीयांना वाटते.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करून सुसाईड नोटमध्ये फौजदार गोपाळ बदने व प्रशांत बनकर यांची नावे लिहिल्यानंतर दोघांनाही अटक झाली. मात्र, या प्रकरणावरून राज्यात व देशात वातावरण कमालीचे तापले. गेले आठ दिवस या आगीचा वणवा विझायला मार्ग नाही. विरोधी पक्षाने देशात व राज्यात जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. तर दुसर्या बाजूने कुटुंबीयांनीही तपास यंत्रणांवर आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे सर्वांची मागणी विचारात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्याचे आदेश काल बजावले. त्यानुसार एसआयटी स्थापन करून त्याची सूत्रे राज्य राखीव पोलिस दलाच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे देण्यात आली.
विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश काढून डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासावर देखरेख करण्याच्या सूचना तेजस्वी सातपुते यांना दिल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासावर योग्य देखरेख होण्यासाठी आपली नियुक्ती करण्यात आली असून, आपण तत्काळ सातारा येथे जाऊन संबंधित गुन्ह्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सातारा व तपासी अधिकारी यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास योग्य पद्धतीने व कालमर्यादेत होईल हे सुनिश्चित करावे तसेच गुन्ह्याच्या तपासाचा प्रगती अहवाल वेळोवेळी या कार्यालयास सादर करावा, अशा सूचना विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिल्या आहेत.
एसआयटीच्या प्रमुख म्हणून नियुक्ती होताच तेजस्वी सातपुते यांनी सातार्यात येऊन तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली. जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोशी व संबंधित तपासी अधिकार्यांची त्यांनी बैठक घेतली. पुढचे आठ दिवस तपासाशी संबंधित सर्व त्या मुद्द्यांवर त्यांच्याकडून देखरेख होऊन सविस्तर अहवाल दिला जाणार आहे.
तेजस्वी सातपुते यांनी यापूर्वी सातार्याचे जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून काम केले आहे. सातार्याच्या डॅशिंग लेडी सिंघम अशी त्यांची ओळख राहिली. मोका व तडीपारीच्या कारवाया करून सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारांचे त्यांनी कंबरडे मोडले होते. तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीमुळे सत्य उजेडात येईल, अशी खात्री सातारा जिल्हावासीयांना वाटते.
सातार्याच्या जिल्हा पोलिस प्रमुख असताना तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्याचा क्राईमरेट कमी करत 16 मोके, 43 तडीपारी व 1 एमपीडीएचई कारवाई केली होती. 88 मर्डर, 47 दरोडे, 128 जबरी चोरी, 14 चेन स्नॅचिंग, 138 घरफोड्या, 66 चोर्या उघडकीस आणल्या होत्या. तर 1007 जुगार केसेस, 2063 दारूबंदी केसेस, 27 अमली पदार्थ केसेस केल्या होत्या. मोकाच्या 16 प्रस्तावात त्यांनी 90 आरोपींवर कारवाई केली होती. तडीपारीच्या 31 प्रस्तावात 121 आरोपींवर कारवाई केली होती. त्यामुळे गुन्हेगारांची दहशत मोडीत निघाली होती. त्यानंतर सोलापूरच्या ग्रामीण जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून ऑपरेशन परिवर्तन राबवत सोलापूरमध्ये आपल्या कामगिरीचा डंका बजावला होता. त्यांच्या ऑपरेशन परिवर्तनची केंद्र शासनानेही दखल घेतली होती. पोलिस महासंचालक पदक देऊन त्यांचा गौरव झाला होता.