

शिवथर : सातारा - लोणंद रस्ता दिवसेंदिवस डेंजरझोन होत चालला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांनी अनेकांचे जीव घेतले आहेत. गुरुवारी रात्रीही शिवथर येथे झालेल्या भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. कैलास ज्ञानेश्वर फासे (वय 30, रा. भिकवडी - विटा, जि. सांगली) असे त्यांचे नाव आहे.
दुचाकी खड्ड्यामध्ये आदळून कैलास खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेले. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी वाहतूक रोखून धरली. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला. कैलास फासे हे वाठारवरून सातार्याच्या दिशेने दुचाकी (क्रमांक एमएच 10 ई 3341) वरून निघाले होते. शिवथरमध्ये दोन महाकाय खड्डे पडले आहेत.
पैकी एका खड्ड्यामध्ये फासे यांची दुचाकी जोरदार आदळली. त्यामुळे ते रस्त्यावर कोसळले. याचदरम्यान समोरून आलेल्या कंटेनरचे (एनएल01एन0981) चाक फासे यांच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री 8 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले. जमाव जमल्यामुळे काही काळ वाहतूक रोखली गेली. दोन दिवसात खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. सातारा तालुका पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने रूग्णवाहिका पाठवून पुढील कार्यवाही केली.