पालिकेत भ्रष्टाचार झाला हे उदयनराजेंनी मान्य केले : आ. शिवेंद्रराजे भोसले

पालिकेत भ्रष्टाचार झाला हे उदयनराजेंनी मान्य केले : आ. शिवेंद्रराजे भोसले

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा नगरपालिकेतील भ्रष्टाचार लोकं उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. उदयनराजेंनी नेहमीचे डायलॉग बदलून सातारकरांसाठी काहीतरी करावे. सातारा पालिकेत ज्यांची ज्यांची सत्ता होती, त्या कारभाराची ईडी चौकशीची मागणी करून खा. उदयनराजेंनी नगरपालिकेत भ्रष्टाचार झाला हे एकप्रकारे मान्यच केले आहे, असा पलटवार आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केला.

सातारा नगरपालिकेत पूर्वी आणि आत्ता ज्यांची सत्ता आहे त्यांची ईडीची चौकशी लावावी, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले
यांनी केली. याबाबत माध्यमांशी बोलताना आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारा पालिकेची ईडी चौकशी व्हावी यासाठी खा. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र द्यावे. राज्यसभेचे ते खासदार असल्यामुळे त्यांना माझ्यापेक्षा दिल्लीला जाणे सोपे आहे. सातारा विकास आघाडीने केलेल्या भ्रष्टाचारावर आम्ही बोलत आहोत. सातारकरही जे बघत आहेत ती वस्तुस्थिती आहे. सातारा पालिकेत भ्रष्टाचार झाला हे उदयनराजेंनीही मान्य केले आहे.

खा. उदयनराजे भोसले यांनी समोरासमोर या, असे आव्हान दिले आहे, याबाबत विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आम्ही समोरासमोर राहत आहोत. त्यांनी घरातून उठून माझ्याकडे यावे. सारखं काय समोरा समोर या, मैदानात या म्हणता. उदयनराजेंनी डायलॉग बदलावेत. सातारकरांसाठी काही तरी करा. सारखं समोरासमोर या हे बस्स झालं, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news