Shivendraraje Bhosale | आमच्‍या उमेदवारांवरच पक्षांतर्गत कुरघोड्या : शिवेंद्रराजेंचा गौप्यस्फोट

अडचणी सांगत राष्ट्रवादी-सेनेकडून वेगळा निर्णय
Shivendraraje Bhosale
Shivendraraje bhosalePudhari Photo
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा जिल्हा मध्यतर्वी निवडणुकीत महायुती करूनही माझ्या उमेदवारांविरोधात पक्षांतर्गत कुरघोड्या झाल्या, असा खळबळजनक गौप्‍यस्‍फोट राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या निवडणुकीनंतर चेअरमनपदाचा निर्णय स्थानिक पातळीवर एकमत न झाल्यास वरिष्ठ पातळीवर होणार होता. या पदासाठीचे नावही मंत्री मकरंद पाटील यांना सांगण्यात आले. मात्र, इथले काही विषय व अडचणी महायुतीतील मित्र पक्षांनी मांडल्या. वरिष्ठांनी केलेल्या सूचना त्यांच्या कानावर घालूनही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने वेगळा निर्णय निर्णय घेतल्याचेही त्‍यांनी सांगितले.

महायुतीतील मित्रपक्षांनी समन्वयाचा अभाव ठेवल्याने भाजप नाराज आहे का? असे विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, जिल्हा बँकेच्या पदाधिकारी निवडीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नेत्यांशी माझ्या काय चर्चा झाल्या हे मी पदाधिकारी निवडी दिवशीच सांगितले आहे. त्या चर्चांच्या अनुषंगाने वरिष्ठांकडून आलेल्या सुचना मंत्री मकरंद पाटील व इतरांपर्यंत पोहोचल्या होत्या. राष्ट्रवादी व शिवसेनेने वेगळा निर्णय केला ही वस्तुस्थिती आहे. माझ्याशी ज्या चर्चा झाल्या किंवा मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात झालेले बोलणे संबंधितांपर्यंत पोहोचवूनही त्यांनी आमचा निर्णय झाल्याचे सांगितले. सेना-राष्ट्रवादीने वेगळा निर्णय घेतला, असेही ते म्‍हणाले.

जिल्हा बँकेच्या पदाधिकारी निवडीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, अशी तुमची भूमिका असताना ना. जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री निर्णय घेतील असे सांगितले, याकडे लक्ष वेधले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, निवडणूक जाहीर झाली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील व आम्ही एकत्र होतो. त्यादिवशी मंत्री जयकुमार गोरे सोलापूरला निघून गेल्याने या बैठकीला नव्हते. त्यावेळी तिघांनी सांगितले की, विकास सेवा सोसायटी मतदारसंघाच्या जागा सोडून बाकीच्या जागांचे वाटप तुमच्या पातळीवर करून घ्या. त्यामध्ये कुठल्या जागेसाठी कुठे अडले तर आमच्याकडे आणा किंवा मी निर्णय करेन असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीचा विषयही असाच होता. स्थानिक पातळीवर अडचण आली तर वरिष्ठ पातळीवर चर्चा करायची असे ठरले होते. इथले काही विषय व अडचणी महायुतीतील मित्र पक्षांनी मांडल्यावर ते वरिष्ठांच्या कानावर घातले. त्यांनी मला ज्या सुचना केल्या त्या मंत्री मकरंद पाटील व मंत्री शंभूराज देसाई हे दोघे एकत्र असताना मंत्री पाटील यांना सांगितल्या. चेअरमनपदाचे नावही सांगितले. व्हाईस चेअरमनचा निर्णय आपण घेऊ असे बोलणेही झाले होते, असे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी व शिवसेनेने पदाधिकारी निवडीवर घेतलेल्या निर्णयावर नाराजी आहे का, असे विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, वरिष्ठांच्या भूमिकेबद्दल मी बोलू शकत नाही. पक्ष म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्हा बँक निवडणुकीत पक्ष म्हणून एकत्र होतो. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सुचनेनुसार महायुती केली. माझ्याकडे मतदान असतानाही मी माघार घेतली. त्यामुळे माझ्या लोकांची नाराजी आली. पक्ष व मुख्यमंत्र्यांसाठी आपण हे करत असल्याचे सांगत त्यांची समजूत काढली. बँकेच्या निवडणुकीत आमच्या लोकांवर पक्षांतर्गत कुरघोड्या झाल्या. मी पावले उचलल्याने त्या कुरघोड्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत. मात्र, त्याचा फटका मतदानाला बसला ही वस्तुस्थिती असल्याचे मंत्री शिवेंद्रराजे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.