

शिरवळ : शिरवळ (ता. खंडाळा) येथे शनिवारी मध्यरात्री एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या बेदम मारहाणीत अतिश अशोक राऊत (वय 23) याचा मृत्यू झाला. संशयित हे तालुक्यातीलच पळशी येथील आहेत. संशयितांनी अतिशचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव केल्याने शिरवळमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयितांच्या अटकेसाठी सोमवारी ग्रामस्थांनी शिरवळ बंदची हाक दिली आहे. तेजस भरगुडे व दीपक भरगुडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अशोक दिनकर राऊत यांनी फिर्याद दिली आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ येथील आतिश अशोक राऊत हा युवक कवठे (ता. खंडाळा) येथील खासगी कंपनीमध्ये कामाला होता. शनिवारी (दि. 27) मध्यरात्री 2 च्या दरम्यान पळशी येथील नातेवाईकांनी अतिशचे वडील अशोक राऊत यांना अतिशला मारहाण झाली असून पळशी येथे या, असे सांगितले. तर अशोक राऊत यांनी नातेवाईकांना अतिशला शिरवळ येथील रुग्णालयात पाठवण्याची विनंती केली. तसेच मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पोहोचले. यावेळी अतिशचे कपडे फाटलेले व बेदम मारहाण केल्याचे दिसून आले. यावेळी अतिशने वडिलांना पळशीतील युवकांनी मारहाण केल्याचे सांगितले व तो बेशुद्ध झाला. त्यानंतर अतिशला पुण्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. ससून हॉस्पिटल येथे शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
घटनेनंतर उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, पोनि यशवंत नलावडे, सपोनि किर्ती म्हस्के, सपोनि सुशिल भोसले यांनी पाहणी केली. अतिशला मारहाण केल्यानंतर संशयितांनी अपघात दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिरवळ ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी संशयितांना अटक करावी, यासाठी ग्रामस्थांनी सोमवारी शिरवळ बंदची हाक दिली आहे.