

मिरज : पोलिस आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवत मिरजेतील निवृत्त एसटी अधिकाऱ्याला तब्बल सव्वाकोटी रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रवींद्र कुलकर्णी यांनी अज्ञाताविरोधात मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिरजेतील रवींद्र कुलकर्णी हे निवृत्त एसटी अधिकारी आहेत. दिनांक 3 ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यांना अज्ञाताने व्हॉट्स अप कॉल व मोबाईलवरून संपर्क साधला. या भामट्याने विजय मल्ल्या याच्या टोळीतील नरेश गोयल याच्या घरात अडीचशे बनावट बँक पासबुके सापडली आहेत. यामध्ये तुमच्या नावाचे देखील बँक पासबुक सापडले आहे. संबंधित खात्यावरून हवाला व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. तुमच्या खात्यावर झालेल्या बँक व्यवहारप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची चौकशी सीबीआयकडून केली जात असल्याची बतावणी केली. तसेच रवींद्र कुलकर्णी यांना, त्यांची रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून देखील चौकशी केली जात आहे, तुमच्या खात्यावर झालेले व्यवहार खरे आहेत की हवालातील आहेत, याची देखील चाचणी केली असून, याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्या खात्यावरील रक्कम ही तुमचीच असल्याचे स्पष्ट करण्यासाठी बँक खात्यातील 95 टक्के रक्कम पडताळणीसाठी दिलेल्या खात्यावर ट्रान्स्फर करावी. ही रक्कम भरली नाही, तर सीबीआयकडून अटक केली जाईल, असे सांगून, खाते गोठवण्याची धमकीही देण्यात आली. त्यामुळे कुलकर्णी यांनी त्यांच्या स्टेट बँक, एचडीएफसी आणि सेंट्रल बँकेतील खात्यांमधील रक्कम आरोमानी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, वर्ल्ड टच हॉस्पिट्यालिटी सर्व्हिसेस, एमएमएस सोशल वेल्फेअर ट्रस्ट, दिल्लीतील करण धवन याच्या खात्यावर आणि गुडगावमधील पंजार इंटरप्रिन्सेस या खात्यावर वर्ग केली.
सव्वा कोटी रुपयांची रक्कम वर्ग करूनही सीबीआयकडून कोणतीही पडताळणी झाल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले नाही. याबाबत त्यांनी चौकशी केल्यानंतर, ही फसवणूक असल्याचे त्यांच्यासमोर आले. याप्रकरणी त्यांनी अज्ञाताविरोधात मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, या डिजिटल अरेस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे.