

सातारा : राज्यात 'अल निनो'च्या प्रभावामुळे अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे तातडीने फेरसर्वेक्षण करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी. सरकारने केवळ कर्जमाफीच्या घोषणा न करता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. टप्प्याटप्प्याने कर्जमाफीच्या याद्या जाहीर करून बळीराजाची थट्टा सुरू आहे. ही थट्टा थांबवावी; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शशिकांत शिंदे म्हणाले, सोलापूर, विदर्भासह सातारा जिल्ह्यातील काही भागांत दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असतानाही शासनाने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत. आता पिकांचे नुकसान झालेल्या भागात फेरसर्वेक्षण करून प्रत्यक्ष पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. सरकार स्वतः कर्जबाजारी असल्याने एकाचवेळी संपूर्ण कर्जमाफी करण्यात आर्थिक अडचणी येत असतील; मात्र बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. केवळ याद्या पाठवून किंवा घोषणा करून शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाहीत.
तसेच ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये. शासकीय विभागांतील रिक्त पदे तातडीने भरावीत. पोलिस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी किंवा गैरप्रकार होणार नाहीत, याची शासनाने दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणीसाठी संघटनात्मक पातळीवर बैठका घेऊन काम करण्यात येणार आहे.
दरम्यान, आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या कारभाराबाबत आरटीओ कार्यालयात जाऊन लेखी खुलासा मागण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, अभय जगताप, सुवर्णा पाटील, प्रविण धस्के, नरेश देसाई, अर्चना देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मराठा व ओबीसीत वाद निर्माण करून सरकारने स्वार्थ साधला
मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण होणार नाही, याची जबाबदारी सरकारची आहे. दोन्ही समाजांमध्ये वाद निर्माण करून सरकारने राजकीय स्वार्थ साधला असून त्याचा फटका दोन्ही समाजांना बसला आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यात सरकारविरोधात तीव्र भावना असून आगामी काळात त्याचा परिणाम दिसेल. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक राजकारणविरहित आणि पक्षविरहित वातावरणात व्हावी. बँकेचा नावलौकिक आणि हितसंबंध कायम राहणे महत्त्वाचे असून भविष्यातील परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.