

कराड; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यामुळे झालेल्या वेदनामुळे डोळ्यात आसवे अन् खांद्यावर राष्ट्रवादीचा झेंडा घेतलेले हजारो लोक सकाळी आठ वाजल्यापासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी प्रतिक्षा करत होते. झालं हे चांगलं झालं नाही, अशा शब्दात आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आम्ही साहेबांसोबतच असा नाराही कार्यकर्ते देत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी आपण कराडमध्ये येणार असल्याचे जाहीर केले होते. शरद पवार हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळे दर्शन घेऊन नव्या राजकीय वाटचालीस प्रारंभ करणार असल्याने ते काय बोलणार? ते कोणती भूमिका घेणार? याची संपूर्ण राज्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठी उत्सुकता होती. शरद पवार हे सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास पुण्याहून कराडच्या दिशेने रवाना झाले. मात्र तत्पूर्वीच शेकडो निष्ठावंत कार्यकर्ते स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात दाखल झाले होते.
सकाळी नऊनंतर मात्र कार्यकर्त्यांचे जथ्येच्या जथ्ये प्रीतिसंगम बाग परिसरात येत असल्याचे पहावयास मिळाले. यात सातारा जिल्ह्यासोबतच नजीकच्या सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा समावेश होता. पंढरपूर होऊन कराडमध्ये दाखल झालेले दत्तात्रय बडवे यांच्यासह उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पक्षात पडलेल्या फुटीचे दुःख स्पष्टपणे पाहावयास मिळत होते. अनेकांनी झालं हे चांगलं झालं नाही, अजित पवार यांनी असे करायला नको होते अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. तर काहींनी दिलेल्या आमदारांनी परत यावे आणि शरद पवार यांची हात बळकट करावेत अशाही भावना व्यक्त केल्या.
कराडमध्ये सोमवार सकाळपासून रिमझिम पाऊस पहावयास मिळत होता. पाऊस आला तरी आपण हटायचे नाही असे काही कार्यकर्ते आपल्या सहकार्यांना सांगत होते. सकाळी दहानंतर मात्र समाधीस्थळ परिसरातील प्रीतीसंगम बागेत हजारो कार्यकर्ते जमा झाले. हजारो कार्यकर्ते घोषणाबाजी करत शरद पवार यांची प्रतीक्षा करत होते. पावणे अकराच्या सुमारास शरद पवार यांचे आगमन झाल्यानंतर अक्षरश: चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. नियोजित कार्यक्रमानुसार यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात शरद पवार पत्रकारांशी संवाद साधणार होते. आमदार रोहित पवार यांचे सूचनेवरून आ. बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून तशी व्यवस्था करण्यात आली होती.
स्व. यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ परिसरात जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी दुपारपर्यंत सुरू होती. एकीकडे असे असले तरी कार्यकर्त्यांनी संयम बाळगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणा विरोधात वेगळी भूमिका घेतलेल्या अजित पवार यांच्यासह एकाही आमदारा विरोधात कार्यकर्त्यांनी चार तासात एक अवाक्षरही काढले नाही. भाजप नेत्यांबद्दल मात्र संताप व्यक्त केला.