Mahesh Shinde | बांबूपासून इथेनॉल निर्मितीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारणार : आ. महेश शिंदे यांच्या मागणीला वनमंत्र्यांची सकारात्मक ग्वाही

पावसाळी अधिवेशनात आ. महेश शिंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी हे आश्‍वासन दिले
Mahesh Shinde
Mahesh Shinde File Photo
Published on
Updated on

कोरेगाव : राज्यात बांबूपासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी स्वतंत्र संशोधन प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी शासन उपलब्ध करून देईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी विधानसभेत केली. पावसाळी अधिवेशनात आ. महेश शिंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी हे आश्‍वासन दिले.

विधानसभेत आ. महेश शिंदे यांनी बांबूमध्ये असलेल्या कार्बन घटकाचा वापर करून फर्मेंटेशन प्रक्रियेद्वारे इथेनॉल निर्मिती शक्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वन विभागामार्फत विशेष संशोधन संस्था अथवा अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा विचार आहे का? तसेच त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार का? असा सवाल केला. यावर ना. नाईक यांनी बांबूपासून इथेनॉल निर्मितीचे संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि व्यावसायिक उत्पादनाला चालना देण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा उभारण्यात येईल. तसेच या प्रकल्पासाठी लागणारा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

आ. महेश शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, पारंपरिक ऊसाधारित इथेनॉलबरोबरच बांबू हा भविष्यातील पर्यायी आणि शाश्वत ऊर्जा स्रोत ठरू शकतो. यासाठी स्वतंत्र संशोधन यंत्रणा उभारल्यास इथेनॉल क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी राहील. आ. महेश शिंदे यांनी यापूर्वीही पर्यायी ऊर्जा स्रोतांबाबत विविध मुद्दे सभागृहात मांडले आहेत. आता बांबूपासून इथेनॉल निर्मितीच्या दिशेने शासनाने सकारात्मक पाऊल उचलल्याने राज्यातील बांबू लागवडीला चालना मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news