सेल्फीची स्टंटबाजी ठरतेय मृत्यूला कारणीभूत

सेल्फीची स्टंटबाजी ठरतेय मृत्यूला कारणीभूत
Published on
Updated on

सातारा; विशाल गुजर : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला असून येथील निसर्ग सौंदर्य बहरु लागले आहे. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक गर्दी करु लागले आहेत. गटागटाने येणारे तरुण धबधब्याच्या ठिकाणी गमती-जमती करत पाण्यात व धबधब्याजवळ मस्ती व फोटो सेशन करत असून त्यांची ही स्टंटबाजी अनेकदा मृत्यूस कारणीभूत ठरु लागली आहे. काही हुल्लडबाज तर मद्यप्राशन करून इतरांचीही सुरक्षा धोक्यात घालत आहेत. लाखमोलाचा जीव कस्पटासारखा गमवणार्‍या अशा घटना टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग संततधार पाऊस झाल्याने निसर्ग सोंदर्याने नटलेला असून विविध अध्यात्मिक ठिकाणांकडेही जिल्ह्यासह, राज्यातील पर्यटक व भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. ठोसेघर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई यापाठोपाठ आता कास, भांबवली-वजराई बामणोली, कोयनानगर, अजिंक्यतारा, मेणवली, भांबवली, केळवली, सांडवली, सडा वाघापूर, उरमोडी धरण, कण्हेर धरण यासह विविध प्रकारचे छोटे-मोठे धबधबे, या परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी होऊ लागली आहे. याशिवाय सज्जनगड, गोंदवले, शिखर-शिंगणापूर, चाफळ, म्हसवड, औध या धार्मिकस्थळीही भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, या पर्यटनस्थळी अनेकदा अप्रिय घटना घडू लागल्या आहेत.

ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी आलेले काहीजण जीव धोक्यात घालत आहेत. हा धबधबा पाहताना दरीत कोसळून आतापर्यत 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याची खबरदारी घेत येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने धबधबा परिसरास रेलिंग करून घेत प्लेव्हर ब्लॉकही बसवले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र, अनेक हुल्लडबाज सुरक्षा कवच भेदत रेलिंगमधून पाणी पातळीत उतरण्याचा धोका पत्करत आहेत.

कायमस्वरूपी हवा पोलिस बंदोबस्त

पावसाळा सुरू झाला की सातारा तालुका पोलिस ठाण्याच्यावतीने कासरोड, यवतेश्वर, कण्हेर धरण, ठोसेघर येथे चेक पोस्टद्वारे बंदोबस्त लावत असतात. मात्र तो केवळ शनिवार, रविवार या दोनच दिवशी असतोे. धबधबा परिसरात दोन पोलिस असतात. मात्र, इतर दिवशी मद्यप्राशन करून हुल्लडबाज राडा करत आहेत. त्यामुळे एकतरी पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी कायमस्वरूपी असावा. अशी मागणी पर्यटकासह, स्थानिकांमधून होत आहे.

पर्यटन स्थळावर काचांचा ढीग

पर्यटनस्थळी निसर्गाचा आनंद न लूटता मद्यप्राशन करणे हे एक फॅडच निर्माण झाले आहे. आडोसा किंवा वेगळा पॉईंट दिसला की मद्यप्राशन करायला बसलाच. सर्वच पर्यटन स्थळावर मद्याच्या बाटल्यांचा ढीग, सिगारेटची पोकिटे दिसत आहेत.

उरमोडीवर धिंगाणा

उरमोडी धरण परिसर आता पर्यटकांना साद घालत आहे. एकीकडे धरणाचे पाणी तर सभोवती हिरवागार डोंगर त्यामुळे पर्यटकांसह मद्यपी याठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत ठिय्या मांडलेलेच आहेत. याठिकाणी अनेकजण मद्यप्राशन करून धिंगाणा घालताना दिसत आहेत.

स्वयंसेवकांमार्फत गस्त हवी…

जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे आहेत. पावसाळ्यात या भागात ट्रेकिंग करण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फॉरेस्ट गार्ड व गावातील स्वयंसेवकांमार्फत गस्त घातली पाहिजे. धोकादायक ठिकाणांची माहितीही पर्यटकांना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आहे.

यावर बंदी घालण्याची गरज

  • पावसामुळं धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबा परिसर, दर्‍यांचे कठडे, धोकादायक वळणं अशा ठिकाणी सेल्फी काढणे किंवा कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.
  • धबधब्यावर धोकादायक ठिकाणी जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहात उतरणे व पोहणे.
  • धबधब्यावर स्वत:सह इतरांना इजा पोहचेल असे कोणतेही कृत्य करणे.
  • पर्यटनस्थळी व धबधब्याच्या परिसरात मद्यपान करणे.
  • वाहतुकीचे रस्ते आणि धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे.

फलक लावून उपाययोजना राबविण्याची गरज

निषिद्ध क्षेत्र, धोक्याची ठिकाणे, अशा प्रकारचे बोर्ड लावणे, बॅरिकेड्स् लावणे, धोक्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यासोबतच कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तीय हानी होणार नाही, असे नियोजन करून पर्यटनस्थळी उपाययोजना करण्याची गरज आहे.

स्वतःची जबाबदारी ओळखा

पर्यटन स्थळावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला की अनेकजण तोकड्या उपाययोजनांवर बोट ठेवतात. मात्र पर्यटकांनी स्वतःच आपली जबाबदारीही ओळखण्याची गरज आहे. नियम पाळून केलेले पर्यटन सर्वांनाच फलदायी ठरणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक

पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, सुरक्षा रक्षक उपलब्ध करणे, ठिकठिकाणी सूचनाफलक लावणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यास मनाई करणारे फलक लावणे, नदीकाठी फोटो काढण्यास मनाई असल्याचे फलक लावणे, अशा विविध उपाययोजनांचा यामध्ये समावेश आहे.

अतिउत्साहाला बांध घाला…

अतिउत्साही पर्यटक जीवावर उदार होऊन फोटोसाठी स्टंटबाजी करत आहेत. त्यामुळे अनेकजण जीवालाही मुकले आहेत. धोकादायक ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव करणे आवश्यक असले तरी अशा पर्यटकांनीही आपल्या अतिउत्साहाला बांध घालण्याची गरज आहे. आपले कृत्य जीवावर बेतू शकते याची जाणीव ठेवून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सेल्फी काढताना तसेच अतिउत्साह दाखवताना दुर्घटना घडल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यामध्ये ठोसेघर धबधब्यावर घडलेल्या घटना चिंता वाढवणार्‍या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news