

सातारा : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना सोमवारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रसिद्ध केली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे 65 गट व पंचायत संमित्यांचे 130 गण निश्चित झाले. नव्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार आता फलटण, कोरेगाव व खटावमध्ये नव्याने प्रत्येकी 1 गट वाढला आहे. या वाढीव गट व त्याअंतर्गत झालेल्या गणांमध्ये बरीच राजकीय कालवाकालव सुरू झाली आहे. त्याचबरोबर सर्वच गट व गणामधील गावागावात पुनर्रचनेमुळे गलबला व हलकल्लोळ उडाला. दरम्यान, या गट व गणांच्या रचनेवर दि. 21 जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
सातारा जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल मार्च 2022 मध्ये संपला. त्यानंतर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समितीचा प्रशासक म्हणून गटविकास अधिकार्यांनी सूत्रे हाती घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग सक्रीय झाला आहे. आयोगाने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची पुनर्रचना करण्याचे आदेश दिले आहेत. नवीन प्रारूप आराखड्यात मागील 3 वर्षांच्या रचनेत वाढलेले गट व गण रद्द झाले आहेत. त्यामुळे सन 2017 च्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रभागरचना विचारात घेऊन निवडणुकीची कार्यवाही सध्या सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचा प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला. त्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने अधिसूचना काढली. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यानुसार फलटण, कोरेगाव व खटावमध्ये नव्याने प्रत्येकी 1 गट वाढला आहे. यामुळे जिल्हा परिषदेची गटांची संख्या आता 65 वर तर पंचायत समिती गणांची 130 वर पोहोचली आहे.
पूर्वीच्या गट व गणातील काही गावांचा दुसर्या गट व गणात समावेश झाला आहे. तसेच काही गट व गणांची नावेही बदलली आहेत. वाढीव गटांमध्ये व त्याअंतर्गत झालेल्या गणामध्ये आता राजकीय घडामोडींना नव्याने वेग येणार आहे. इच्छूकांनी आता नव्याने जोर बैठका काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे आता वाढीव गट व गणांसह सर्वच गट व गणांमध्ये बरीच राजकीय कालवाकालव सुरू झाली आहे. प्रारूप प्रभाग पदाधिकार्यांसह इच्छूकामध्ये कही खुशी, कही गम असे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रभाग रचनेवर हरकती व सूचना दि. 21 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करता येणार आहेत. त्या हरकतीनुसार जिल्हाधिकारी अभिप्रायासह दि. 28 जुलैपर्यत विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करणार आहेत. त्यानंतर दि. 11 ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी होवून निर्णय देण्यात येणार आहे. दि. 18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर प्राप्त हरकतीवर आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे.
सातारा तालुक्यातील शाहूपुरी, विलासपूर, गोडोली ग्रामीण, दरे, पिरवाडीचा काही भाग सातारा नगरपालिकेत आला आहे. त्यामुळे दोन गट कमी झाले आहेत. त्यामुळे आता सातारा तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 गट व पंचायत समितीचे 16 गण झाले आहेत.