

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी आज साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची त्यांच्या ‘जलमंदिर पॅलेस’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी डॉ. स्मिता जाधव यांना विजयाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली.
‘आम्ही कुठेही कमी पडणार नाही’ – खा. उदयनराजे भोसले
भेटीदरम्यान उदयनराजे भोसले यांनी अत्यंत आपुलकीने डॉ. स्मिता जाधव यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, "स्मिता योगेश जाधव यांचे साताऱ्यात मनापासून स्वागत आहे. त्यांचे वडील आणि सासरे हे दोघेही माझे जिवलग मित्र आहेत. विजयाची शाल आणि बुके मी आधीच दिला आहे; मी आमच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आज आमचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी मिळून स्मिताताईंना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. या निवडणुकीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही."
छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंचा आशीर्वाद मिळाला – डॉ. स्मिता जाधव
या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, "सातारकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि रोखठोक, दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेले खा. छत्रपती उदयनराजे महाराज यांनी दिलेली विजयाची शाल ही माझ्यासाठी साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा आशीर्वाद आहे. पदवीधरांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या लढ्यासाठी हा आशीर्वाद नवी ऊर्जा देणारा ठरेल."
प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या प्रसंगी सातारा जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेते, माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर, प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य काका धुमाळ, सातारा पालिका सभापती अशोक शेडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. मोनिका घोरपडे यांचा प्रामुख्याने समावेश होता.
तसेच नगरसेवक मनोज शेंडे, सुधाकर यादव, विनोद मोरे, प्रशांत आहेरराव, सागर पावसे, पंकज चव्हाण; नगरसेविका सौ. सुजाता राजेमहाडिक, सौ. अपर्णा बाचल, सौ. शारदा वाघमोडे, सौ. विमल गोसावी, सौ. भारती शिंदे, सौ. वैशाली राजेभोसले, सौ. आशा डगळे, सौ. अनिता फरांदे, सौ. हेमलता भोसले; माजी सभापती सौ. सविता फाळके, माजी नगराध्यक्ष नासिर शेख, विजय बडेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, सौ. चित्रलेखा माने-कदम, सौ. सुनेषा शहा यांच्यासह विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते उपस्थित होते.