

सातारा; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आलेखात (परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स) पीजीआय अहवालात महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याने 600 पैकी 430 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे राज्यात सातारा जिल्ह्याचा शैक्षणिक गुणवत्तेत पुन्हा एकदा डंका वाजला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून प्रसिध्द केल्या जाणार्या पीजीआयमध्ये शालेय शिक्षण प्रणालीचे विविध मुद्यांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येते. या निकषामध्ये काही बदल करुन परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0 असे नामकरण करण्यात आले आहे. पीजीआयमध्ये देशातील 748 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार सुमारे 73 निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. हे निकष निष्पत्ती आणि प्रशासकीय व्यवस्थापनाशी निगडीत आहेत. सहा गटात 12 मुद्यांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, शाळा व शिक्षकांची उपलब्धता, वर्गातील प्रभावी अध्ययन, उपक्रम, पायाभूत सुविधा, शाळा व विद्यार्थ्यांची सुरक्षितता, डिजिटल अध्ययन आणि प्रशासकीय प्रक्रिया, निधीचा वापर, हजेरी नियंत्रण, यंत्रणा आणि शाळा नेतृत्व विकास, भौतिक सोयी सुविधा, शालेय नेतृत्व विकास आदी मुद्यांचा समावेश होता. या मूल्यमापनात श्रेणी निश्चित करण्यात आली.
सातारा जिल्ह्याला अध्ययन निष्पत्ती 171 गुण तर वर्ग आंतरक्रियामध्ये 86 गुण, भौतीक सोयी सुविधांमध्ये 46 गुण, शालेय सुरक्षा व विद्यार्थी सुरक्षिततांमध्ये 35 गुण तर डिजीटल अध्ययनमध्ये 24 गुण व प्रशासकीय प्रक्रियेमध्ये 68 गुण मिळाले आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा सलग तिसर्या पीजीआयमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. हा क्रमांक असाच कायम राखण्यासाठी शिक्षण व्यवस्थेमधील सर्व यंत्रणेने प्रयत्नांमध्ये नेहमीच सातत्य ठेवणे गरजेचे आहे.
अध्ययन निष्पत्ती या दर्शकामध्ये महाराष्ट्राला 240 पैकी 65.8 म्हणजेच 25 टक्के पेक्षाही कमी गुण मिळालेले आहेत. अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणेसाठी महाराष्ट्रात शिक्षक व पर्यवेक्षीय यंत्रणेला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.
– डॉ. विकास सलगर,
प्राचार्य, डायट फलटण