लोणंद: आज दुपारी बाराचा सुमार... ओढयातून वाहणारे पाणी... हलगी -डफडी वाद्यांचा गजर... बघ्यांची मोठी गर्दी... ढगाळ वातावरणात एकमेकींना हातवारे करून त्वेषाने पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला आणि त्यांना आवरताना ग्रामस्थ... यात पोलिसांची उडालेली धांदल..., अशा वातावरणात सुखेड व बोरी येथील सुमारे दोनशे महिलांनी एकमेकींना अस्सल शिव्यांची लाखोली वाहत सुमारे पाऊन तास पारंपरिक पध्दतीने बोरीचा बार घातला. (Satara News)
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी या गावातील महिला गेली अनेक वर्षांपासून नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बारानंतर दोन्ही गावांच्या मधील ओढ्यात येऊन शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालण्याची परंपरा पुढे चालवित असतात. (Satara News)
यावर्षी जोरदार झालेला पाऊस आणि धोम -बलकवडी कालव्यातून सोडलेल्या पाण्यामुळे बोरी व सुखेडमधून जाणारा ओढा खळखळ वाहत होता. त्यामुळे गुडघाभर पाण्यात बोरीचा बार कसा भरणार, याची उत्कंठा सर्वांना होती. लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलिस, महिला पोलिसांनी सकाळपासून तयारी केली होती. दुपारी बाराच्या सुमारास पहिल्यांदा सुखेड गावातील महिला डफडे, ताशा, शिंग आदी वाद्यांसह वाजत गाजत ओढ्याच्या तीरावर येऊन थांबल्या. काही वेळातच बोरी गावातील महिलांही वाजत गाजत दुसऱ्या तीरावर येताच दोन्ही बाजुच्या महिलांनी एकमेकांना हातवारे करीत शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालण्यास सुरुवात केली. (Satara News)
ओढ्यामध्ये वाहते पाणी असल्याने बार घालणाऱ्या महिलांना आवरताना पोलीस, ग्रामस्थ यांची मोठी धांदल उडत होती. महिलांना आवरताना महिला पोलीस, ग्रामस्थ यांच्यासह अनेक जण पाण्यात पडत होते. तर काही जण पाणी अंगावर उडवत होते. बार घालणाऱ्या महिला हातवारे करीत करीत शिव्यांची लाखोली वाहताना जसजसे डफडे, शिंग, तुतारीचा आवाज येत होता. तसा महिलांचा उत्साह वाढत होता. टाळ्या वाजवून महिला एकमेकींना आव्हान देत होत्या. सुमारे पाऊण तास बोरीचा बार चालला होता.