

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांनी राज्यव्यापी आंदोलन आज (सोमवार) पासून सुरू केले आहे. सर्व कर्मचारी स्वत:हून आंदोलनात सहभागी झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील 11 आगारातील एसटीची चाके पुन्हा थांबली आहेत. त्यामुळे दिवाळीत आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासामध्ये गैरसोयीला सामोरे जावे लागले. दिवसभरात हजारो फेर्या रद्द होवून लाखो रूपयांचा महसूल बूडाला.
सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव खंडाळा, फलटण, वडूज, दहिवडी, मेढा, कोरेगाव या 11 आगारातील एसटी कर्मचार्यांनी मध्यरात्रीपासून काम बंद आंदोलन सुरू केले. महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचारी या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेल्या एक वर्षापासून 36 एसटी कर्मचार्यांनी आर्थिक अडचणीमुळे व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
एसटी कर्मचार्यांना पगार अल्प प्रमाणात मिळत असल्यामुळे त्या पगारामध्ये कर्मचार्यांचा उदरनिर्वाह करणे कठीण बनले आहे. कमी पगार, आर्थिक चणचण व कर्जबाजारीपणामुळे कर्मचारी स्वत:चे जीवन संपविण्याचा निर्णय घेत आहेत. ही दुर्देवी बाब असल्याने शासनाने वेळीच एसटी कर्मचार्यांच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.