

सातारा : पाचगणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा आणि गाढवांचा वावर वाढला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना कुत्र्याने चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही भटकी कुत्री झुंडीने फिरत असून, चिमुकले, वयोवृद्ध, महिला, तरुणींवर हल्ले करत आहेत. सकाळी-संध्याकाळी शाळकरी मुलांसह पादचारी व दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी मुलांना शाळेत सोडताना कुत्री अंगावर येतात. तसेच दुचाकी चालकांना या कुत्र्यांचा अडथळा येत असल्याने अपघाताचीही भीती आहे.
उघड्यावर अन्न दिल्याने ही भटकी कुत्री परिसरात फिरताना दिसत आहेत. तसेच ही कुत्री दुचाकी किंवा पादचाऱ्यांचा पाठलाग करत असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे. यासाठी पालिकेने नगरपालिका विभागांनी खबरदारी म्हणून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
शहरात अलीकडे भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर अन्न देणे, रस्त्यात बिस्कीट टाकणे याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्यातून या भटक्या कुत्र्यांमध्ये आक्रमकता वाढत असल्याचे वास्तव आहे. मुख्य रस्त्यावर बिनदिक्कतपणे मोकाट जनावरे फिरताना दिसत आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेता भटक्या कुत्र्यांना आणि त्यांना रस्त्यावर अन्न देणाऱ्यांनाही प्रतिबंध करण्याची गरज व्यक्त होत आहे.