

सातारा : गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, उत्साह आणि आनंदाचा सण. मात्र याच उत्सवातील विसर्जन मिरवणुकीत होणाऱ्या डीजेच्या कर्णकर्कश दणदणाटाची धास्ती आता सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांना सतावू लागली आहे. डीजेच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून विसर्जन मिरवणुकीदिवशी काही ज्येष्ठ नागरिकांनी चक्क सातारा शहरच सोडण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
सातारा शहरातून राजवाडा ते कमानी हौद, त्यानंतर शेटे चौक, मोती चौक, प्रतापगंज पेठ, राधिका चौक ते बुधवार नाका असा विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आहे. या मार्गावर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना डीजेच्या आवाजाची विशेष भीती वाटत आहे. यातील काही नागरिकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे, तर काही जण विविध आजारांनी त्रस्त आहेत.
मोठ्या आवाजामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती असल्याने त्यांनी मिरवणुकीच्या काळात घराबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोणी नातेवाईकांकडे, कोणी मित्रांकडे, तर काही जण शहराबाहेरील लॉजमध्ये राहण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. ज्या शहरात आयुष्याचा मोठा काळ घालवला, त्याच शहरात गणेशोत्सवाच्या आनंदाच्या दिवसांत स्वतःच्या घरात राहणे टाळावे लागणे, ही बाब ज्येष्ठ नागरिकांसाठी वेदनादायी ठरत आहे.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणेशोत्सव साजरा व्हावा, मिरवणुकीत तरुणाईने उत्साह व्यक्त करावा, याला ज्येष्ठांचा विरोध नाही. मात्र उत्सवाच्या नावाखाली कानठळ्या बसवणारा आवाज आणि डोळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लेझर लाईटचा वापर होऊ नये, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. डीजेच्या आवाजामुळे काही ज्येष्ठ नागरिकांना अस्वस्थता, घबराट आणि रक्तदाबासंबंधी त्रास जाणवण्याची भीती आहे. विशेषतः हृदयविकाराचा इतिहास असलेल्या नागरिकांसाठी मोठ्या आवाजाचा ताण चिंतेचा विषय आहे. ‘गणेशोत्सव साजरा करा; पण आमच्या जिवाची किंमत मोजून नाही,' अशी भावना या ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र; महाराष्ट्रभर बंदीची मागणी
साताऱ्यातील डीजेविरोधी आंदोलनाचे समन्वयक प्रसाद चाफेकर यांनी वर्षभरापासून डीजेविरोधात आंदोलन सुरू केले आहे. सातारा शहरातील २० हून अधिक ज्येष्ठ नागरिक संघ तसेच विविध सामाजिक संस्थांना सोबत घेऊन त्यांनी डीजेविरोधात भूमिका मांडली आहे. भरपावसातही डीजेविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. आता या आंदोलनाने आणखी व्यापक स्वरूप घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्रातील सर्वच उत्सव तसेच खासगी कार्यक्रमांमध्ये डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.