सातारा : ऐन दिवाळी सण मंगलमय वातावरणात साजरा व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने माध्यमिक, उच्च माध्यमिक, नगरपालिका, अंशत: उच्च माध्यमिक नगरपालिका यासह विविध माध्यमांच्या शाळांमधील कर्मचार्यांचे पगार बँक खात्यावर दिवाळीपूर्वीच जमा केले असल्याने कर्मचार्यांची दिवाळी गोड होण्यास मदत होणार आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जाणारा दिवाळी सण यावर्षी दि. 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. सर्वच माध्यमांच्या शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना दिवाळी सण आनंदाने व समाधानकारकरीत्या साजरा व्हावा त्यासाठी दिवाळी सणापूर्वीच ऑक्टोबरचे वेतन देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या बँक खात्यावर शुक्रवार, दि. 25 ऑक्टोबर रोजी वेतन जमा केले आहे. जिल्ह्यातील माध्यमिकच्या 524 शाळांमधील 6 हजार 657 कर्मचारी, उच्च माध्यमिकच्या 98 शाळांमधील 923 कर्मचारी, अशंत:उच्च माध्यमिक (टप्पा) 29 शाळांमधील 169 कर्मचारी, नगरपालिकेच्या एका शाळेमधील 12 कर्मचारी, अशंत: माध्यमिक (टप्पा) 49 शाळांमधील 348 कर्मचारी, अशंत: माध्यमिक तुकड्या (टप्पा) 18 शाळेतील 50 कर्मचारी, 8 अध्यापक विद्यालयातील 57 कर्मचारी, 3 सराव पाठशाळेतील 20 कर्मचारी असे मिळून 730 शाळांमधील 8 हजार 236 कर्मचार्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वीच वेतन जमा झाले आहे.
शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे यावर्षी माध्यमिकच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांची दिवाळी गोड होण्यास मदत झाली आहे. शिक्षकांचे वेतन वेळेत झाल्याने शिक्षक समाधानी आहेत. शिक्षण विभागाचा जो मूलभूत घटक आहे त्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे पूर्ण लक्ष केंद्रीत होण्यास मदत होईल. गतवर्षी सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा टक्का वाढला आहे. यावर्षीही अशीच अपेक्षा असून सर्वच शिक्षक ती नक्कीच पूर्ण करतील, असा आत्मविश्वास वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाला आहे.