सातारा : पुढारी वृत्तसेवा
जनतेचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास उडाला असून, वेळीच सुधारणा करायला हवी. सत्ताधारी किंवा विरोधकांच्या कुटुंबीयांसोबत अत्याचाराची घटना घडली असती, तर कुणी बोलले असते का? अत्याचार करणार्या नराधमांना गोळ्या घालणं हे फार सहज झालं. अशा नराधमांना जनतेच्या ताब्यात देऊन तुडवून मारायला हवं, अशी संतप्त प्रतिक्रिया खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी बदलापूर अत्याचारप्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटर घटनेबाबत दिली.
बदलापूर घटनेबाबत बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, प्रत्येक गोष्टीकडे जर राजकारण म्हणून बघितलं जात असेल, तर त्यापेक्षा दुर्दैव दुसरे नाही. आज जी काही बदलापूरला घटना घडली त्याच्या अगोदरपण अनेक घटना घडल्या, काय झालं त्याचं? हेच जर आपल्या कुटुंबातल्या कुणाबरोबर घडलं असतं तर आपली प्रतिक्रिया काय असती? तरी देखील अशा लोकांचं वकीलपत्र स्वीकारलं जातं. त्यातून ते कसे निर्दोष आहेत, हे सिद्ध केले जाते. न्याय मिळत नसेल तर लोकं काय करणार? कुठं मागायचा न्याय? असे सवाल उदयनराजेंनी केले.
ते पुढे म्हणाले, अन्यायाच्या घटना अशाच घडत राहणार. त्याचं कारण म्हणजे अत्याचार्यांवर धाक राहिलेला नाही. कुणी अत्याचार केला तर विचार न करता त्याला सरळ लोकांसमोर जाहीर फाशी देऊन टाका. त्याला लोकांच्या ताब्यात द्या. याशिवाय समाजात सुरक्षेची भावना निर्माण होणार नाही. ज्यांनी निष्पाप लोकांना मारले त्यांच्यावर करोडो रुपये खर्च झाले. हेच दुसर्या देशात असतं तर त्याला गोळ्या घालून मारले असते. अन्याय करणार्यांची पोहोच जास्त असेल तर त्यांचे ऐकले जाते. अन्याय झालेल्यांचे काही ऐकूण घेतले जात नाही. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींवरचा विश्वास उडाला तर कुणी विचार करणार नाही. सुधारणा केली नाही तर ती वेळ यायला फार काळ वाट पाहावे लागणार नाही. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवकाळात ज्या पध्दतीने न्याय व्यवस्था केली, तशी आता झाली पाहिजे. कायद्यात बदल झाले पाहिजेत, असेही खा. उदयनराजे म्हणाले.