

सातारा : जिल्ह्यातील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मागील तीन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे महामार्गावर पाणी साचून रस्ता पूर्णतः जलमय झाला आहे. महामार्गावर वाहणाऱ्या पाण्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून पावसाचे प्रमाण इतके वाढले आहे की महामार्गालाच नदीचे स्वरूप आले आहे.
पावसाची संततधार सुरूच असल्याने काही दुचाकी आणि हलक्या वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळे त्या रस्त्यात अडकून पडल्याच्या घटना घडल्या. तसेच या परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांनाही मोठे नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. या भागात पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. काहींच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून अद्याप मदतीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही सुरू झालेली नाही. याबाबत तातडीने पाणी उपसण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.