

सातारा : कोरेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून वातावरणात उष्मा वाढला होता. रविवारी बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला. मात्र सोमवारी व मंगळवारी सायंकाळी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली.
कोरेगाव शहरासह तालुक्यातील नऊ महसूल मंडलात पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे बहुसंख्य ठिकाणी झाडासह झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या तर मुसळधार पावसाचे पाणी रस्त्यांवरून जोरदार वाहू लागल्याने वाहन चालकांची चांगलीचं तारांबळ उडाली.
कोरेगाव शहर,रहिमतपूर सह नऊ महसूल मंडल परिसरात रविवारी व सोमवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. भाडळे खोऱ्यासह, सातारा रोड महसूल मंडलात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे भोसे सह तालुक्यातील बहुसंख्य गावात ओढ्या नाल्यांना पूर आला.
दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत उष्मा होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावाधाव झाली. विक्रीसाठी आणलेल्या आंब्यांची काळजी घेताना व्यापाऱ्यांची धावपळ सुरू होती. त्यांचेही थोड्या प्रमाणात नुकसान झाले. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित होणे नित्याचीचं बाब झालेली आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना, कुठे फॉल्ट आहे हेच सापडत नव्हते. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत. वीज सारखी जा-ये करत असल्याने घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित होता.