

प्रवीण शिंगटे
सातारा : पुणे-मिरज लोहमार्गावरील सातारा रेल्वे स्टेशनकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेले लोहमार्ग पोलिस स्टेशन लालफितीच्या कारभारात अडकले आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच आहे. रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित मंजूर पोलिस स्टेशन लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अशी मागणी होत आहे.
सातारा शहरापासून 4 ते 5 किलोमीटर माहुली येथे रेल्वे स्टेशन आहे. मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे स्टेशन असल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे माहुली येथील रेल्वे स्टेशनवर दररोज प्रवाशांची वर्दळ असते. रेल्वे मंत्रालयामार्फत सातारा रेल्वे स्टेशन येथे लोहमार्ग पोलिस स्टेशन सुमारे 10 वर्षापूर्वी मंजूर झाले आहे. फक्त कागदावरच पोलिस स्टेशन मंजूर झाले असले तरी याकडे रेल्वे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे. पुणे ते मिरज दरम्यान रेल्वे दुहेरीकरणाचे काम पुर्णत्वाकडे गेले आहे. हे काम पुर्णत्वास गेल्यामुळे गाड्यांची धावगतीही वाढली आहे. तसेच प्रवासी व मालगाड्यांची संख्या हळूहळू वाढणार आहे.
सातारा जिल्ह्यातील रेल्वे मार्ग 152 किलोमीटर लांबीचा आहे. सातारा रेल्वे स्टेशन हे जिल्हास्तरीय स्टेशन आहे. दररोज 24 तासात 20 ते 25 प्रवासी रेल्वे गाड्या तर मालगाड्याही तेवढ्याच धावत असतात. या दोन्ही बाजूच्या मार्गावर रेल्वे गाडीने दररोज जिल्ह्यातील नोकरदार, कामगार, विद्यार्थी, व्यापारी, पर्यटक असे हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. सातारा जिल्ह्यात रेल्वे प्रवासादरम्यान दरोडा, रॉबरी, चोरी, पाकीट चोरी, गर्दी व मारामारी यासारखे प्रकार घडल्यास रेल्वे प्रवाशांना 144 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात जावून तक्रार नोंदवावी लागते. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. जिल्ह्यातील रेल्वे मार्ग डोंगराळ प्रदेश, शेतशिवारातून जात असल्यामुळे रेल्वेगाडीत भुरट्या चोऱ्या, जबरी चोऱ्या, मारामारीसह रेल्वेच्या रुळावर आत्महत्या, जनावरे अपघात, शेतकरी आंदोलन, किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असतात. जिल्ह्यातील प्रवाशांना रेल्वेत प्लॅटफॉर्मवर , स्टेशन परिसरात अथवा रेल्वे मार्गावर अपघात घडल्यास तब्बल 144 किलोमीटर लांब असलेल्या मिरज येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात जावून फिर्याद द्यावी लागते.
सातारा जिल्ह्यात रेल्वे मार्गावर दर महिन्याला सरासरी 15 विविध प्रकारचे गुन्हे घडत आहेत. तर वर्षात सरासरी 200 ते 250 गुन्हे घडत असतात. रेल्वे प्रवाशांना तक्रार दाखल करण्यासाठी सातारा येथून मिरज लोहमार्ग पोलिस ठाणे येथे जावे लागत आहे. परिणामी तक्रारदारांचा वेळही जातो. तसेच त्यांना मानसिक व आर्थिक त्रासही होत असतो. तक्रार दाखल करण्यात वेळ जात असल्याने तक्रार निवारण, चौकशी करण्यासाठी वेळ जातो. तर काही गुन्हे घडूनही तक्रार दाखल करण्याचे ठिकाण जास्त अंतरावर असल्याने प्रवाशांकडून गुन्हा दाखल केला जात नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे.
लोहमार्ग पोलिस ठाण्याची निर्मिती झाल्यास वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रेल्वे मार्गावर घडलेले गुन्हे तत्काळ दाखल होतील. गुन्ह्यांचा तपास जलदगतीने होवून रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर होईल. जिल्ह्यातील कराड, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, जरंडेश्वर, वाठारस्टेशन, लोणंद यासह अन्य स्टेशनवर घडणारे किरकोळ स्वरुपाचे गुन्हे कमी होणार आहेत. शिवाय, स्टेशन आणि परिसरात गुन्हेगारांचा वावर कमी होवून रेल्वे प्रवाशांना सुरक्षितता मिळणार आहे.