

सातारा : सातारा जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिक त्याचबरोबर शेतमालाशी निगडित असलेल्या सातारा रेल्वे स्थानकावरील मालधक्क्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र धारकांच्या विनंतीवरून माढ्याचे खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी या विषयात लक्ष घातले होते. मध्य रेल्वेने याबाबत आता अधिकृतपणे भूमिका जाहीर करत संपूर्ण मालधक्का परिसराचा विकास करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोरेगाव येथील अॅग्रो हायटेकचे प्रमुख संचालक अनिल ढोले यांच्या खताची रॅक 5 जुलैला सातारा रेल्वे स्थानकात आली होती. यावेळी खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मालधक्क्याची पाहणी केली होती. सातारा रेल्वे स्थानकामधील रेक अर्थात मालगाडीच्या डब्यांची साखळी थांबा तथा धक्क्यावर शेड नसल्यामुळे पावसाळ्यात मालाची चढ-उतार करताना माल भिजून नुकसान होत असल्याचे यावेळी खा. मोहिते-पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. तसेच डॅमेज चार्जेस व विलंब आकाराचीही माहिती देण्यात आली होती.
त्यावेळी खा. मोहिते-पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली होती. त्या अनुषंगाने ना. अश्विनी वैष्णव यांची भेटही घेतली. त्यानुसार त्यांनी मालधक्क्याच्या विकासाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यामुळे आता सातारा मालधक्का येथे कामगार विश्रांती कक्ष, पिण्याचे पाणी आणि शौचालय सुविधा, हाय मास्ट दिवे, काँक्रीट सर्कुलेशन एरिया आणि चार वॅगन क्षमतेचे कव्हर शेड उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सातारा स्थानकावरील मालाच्या शेडच्या विकासाला अगोदरच मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये 21 वॅगन क्षमतेचा झाकलेले शेड, व्यापारी कक्षाची व्यवस्था, सुधारित प्रकाशयोजना, प्रवेश रस्त्यांचा विकास आणि कामगारांसाठी आवश्यक सुविधांचा समावेश आहे. याविषयी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत.