

सातारा : अमृत भारत योजनेंतर्गत सातारा रेल्वे स्थानकात कोट्यवधी रुपयांच्या आलेल्या निधीतून मोठ्या प्रमाणात निकृष्ट कामे झाल्याच्या तक्रारी आहेत. दोन वर्षापूर्वी नवीन इमारतीचे उद्घाटन झाले आहे. त्या इमारतीला तडे व भेगा पडल्या आहेत. तर नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरील पायऱ्या फुटल्या आहेत. गॅलरीतील फरशा निघाल्या असल्याने रेल्वे स्टेशनच्या निकृष्ट कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे.
सातारा रेल्वे स्टेशन येथे रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयीच्या विळख्यात सापडले आहे. अमृत भारत योजनेमधून जुन्या इमारतीचे नुतनीकरण निकृष्ट दर्जाचे होत असून त्याबाबत गांभीर्याने दखल घेवून झालेले कामाचे गुणवत्ता प्राधिकरण विभाग, क्वालिटी कंट्रोल विभाग, दक्षता विभाग यांच्याकडून तपासणी करण्यात यावी. गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून विविध कामे बंद आहेत. कामांचा ठेकेदार बदलण्यात यावा. निकृष्ट दर्जाचे काम केल्याबाबत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी. प्लॅटफॉर्म 1 वरचे महिला प्रतिक्षालयात स्वतंत्र स्वच्छतागृह, बाथरुम, चेंजिंग रूम, फर्नीचरसह सुविधा उपलब्ध करुन बंद असलेले कामे लवकर पूर्ण करावे. सर्व सामान्य प्रतिक्षालय, उच्च श्रेणी प्रतिक्षालय काम स्वतंत्र स्वच्छतागृह, बाथरूम, फर्नीचरही कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावी.
प्लॅटफॉर्म 1, 2, 3 व 4 वरचे स्वच्छतागृहाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच प्लॅटफॉर्मवर अनावश्यक बांधकाम साहित्य पडून असल्याने प्रवाशांना गैरसोयीचे होत असल्याने ते त्वरित हटवण्यात यावे. प्लॅटफॉर्म 3 व 4 वर रेल्वे गाडी कोच इंडीकेटरचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे. प्लॅटफॉर्म 1, 2, 3 व 4 वर दिव्यांगासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा कमी उंचीवर करण्यात यावी. स्टेशनवर प्रवाशांसाठी उपहारगृह नसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी उपहारगृह सुरुकरण्यात यावे.
सातारा रेल्वे स्टेशन येथे रेल्वे प्रवाशांसाठी स्वतंत्र लगेज रुम, पार्सल सुविधा, क्लॉक रुम सुविधा सुरु करण्यात यावी. यासाठी स्वतंत्र इमारतीसह कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात यावेत. सध्या पार्सल बुकींगसाठी एकच कर्मचारी असल्याने बुकींग कॉऊंटरवर लगेज बुकींग करावे लागत आहे. सातारा येथे लगेज, पार्सल बुकींगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. एकच कर्मचारी असल्याने कामाचा प्रचंड ताण एका कर्मचाऱ्यावर येत आहे. पार्सल बुकींगसाठी दोन स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात यावेत.