सातारा : विठ्ठल हेंद्रे
सातारा जिल्हा पोलिस दलाची वेबसाईट ‘अपडेट’ नसल्याने अनेक पोलिस ठाण्यांचे कारभारी जुनेच झळकत असल्याने नेटर्यांचा गडबडगोंधळ उडत आहे. पुसेगाव, रहिमतपूर या पोलिस ठाण्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, ऑनलाईन फसवणूक होवू नये, अशी जनजागृती पोलिस स्वत: करत असताना पोलिस दलाची वेबसाईटच योग्य कार्यान्वित नसल्याने त्याचा फज्जा उडाला आहे.
सातारा जिल्हा पोलिस दलाची स्वतंत्र वेबसाईट आहे. पोलिस दलाच्या वेबसाईटवर मात्र गमती झाल्याचे दिसून येत आहे. सातारा पोलिस दलातील काही अधिकार्यांच्या एक महिन्यांपूर्वी बदल्या झाल्या आहेत. हे जुने अधिकारी जावून त्याठिकाणी नवीन सहायक पोलिस निरीक्षक हजर देखील झाले आहेत. एक महिन्यांपूर्वी हा बदल झालेला असताना वेब साईटवर अद्याप तो बदल करण्यात आलेला नाही.
सातारा पोलिस दलाची वेबसाईट पाहिली असता पुसेगाव पोलिस ठाण्याला सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांची बदली होवून तेथे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांनी कार्यभार स्वीकारला आहे. दुसरीकडे रहिमतपूर पोलिस ठाण्याला सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी विभुते यांच्या ऐवजी आता सचिन कांडगे यांनी कार्यभार स्वीकारला आहे. या दोन्ही पोलिस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असतानाही पोलिस दलाच्या वेबसाईटवर मात्र जुन्याच अधिकार्यांचे फोटो झळकत आहेत. सातारा पोलिस दलाच्या वेब साईटला अपडेट होण्याची गरज निर्माण झाली आहे. हायटेक जमान्यात अनेक नागरिक वेबसाईट पाहून त्यानुसार संपर्क करत असतात. मात्र, सातारा पोलिस दलाच्या वेबसाईटवर वर्षातून अनेकदा त्याच त्या चुका होत असल्याचे समोर येत आहे.