

सातारा : सातारा-मेढा रस्त्यावरील नुने गावच्या हद्दीत रस्त्यालगत असलेल्या सिल्व्हर मून लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकला. या घटनेत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम विलास कल्याणकर (वय 27, रा. सातारा) असे संशयिताचे नाव असून त्याने लॉज चालवण्यास घेतला आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, मेढा रोडवर एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लॉज चालकाकडून जबरदस्तीने काही महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. पोलिसांनी अधिक माहिती घेऊन रविवारी कारवाईचा सापळा लावला. रविवारी दुपारी सातारा शहरापासून साधारण 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिल्व्हर मून लॉज येथे पोलिस गेले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पंचनामा करुन महिलांना व इतर संशयितांना ताब्यात घेतले. सुटका केलेल्या दोन्ही महिला मुंबई व गुजरात राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.