

कोडोली : सातारा पंचायत समितीची मासिक सभा नुकतीच सभापती महेश गाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत अधिकारी व सदस्यांना देण्यात आलेल्या नाष्ट्यातील सॉसमध्ये रंगाची भेसळ आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र, या प्रकारावर फारशी चर्चा न करता विषयाला बगल देण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, विविध विभागांचे विभागप्रमुख गैरहजर राहिल्याने उपस्थित सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सभेला गटविकास अधिकारी सुशील संसारे, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष पवार यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते. मासिक सभेदरम्यान सदस्य व अधिकाऱ्यांना चहा-नाष्टा देण्यात आला. यावेळी सामोसासोबत देण्यात आलेल्या सॉसमध्ये रंगाची भेसळ असल्याचे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी, ‘तुकाराम मुंडे यांच्या आदेशाचे पालन करूया. देण्यात आलेला सॉस कोणीही खाऊ नका,’ असे सांगितले. त्यानंतर हा विषय इथेच थांबला.
सभेदरम्यान अनेक विभागांचे विभागप्रमुख उपस्थित नसल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. ‘आमच्या मतदारसंघातील प्रश्न कोणासमोर मांडायचे? भागात गेल्यानंतर नागरिकांकडून प्रश्न मांडले का आणि ते किती दिवसांत सुटतील, अशी विचारणा केली जाते. त्यांना काय उत्तर द्यायचे?’ असा सवाल सदस्यांनी सभापती महेश गाडे यांच्याकडे केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सभापती गाडे यांनी दिले.
ग्रामीण वीज वितरणाच्या आढाव्यादरम्यान स्मार्ट मीटर बसविताना संबंधित ग्राहकाची परवानगी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. जगमीन-ठोसेघर परिसरातील वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, चंदननगर परिसरातील वाकलेले पोल त्वरित बदलावे, अपशिंगे येथे कायमस्वरूपी वायरमन द्यावा, तसेच पाटखळ येथे बंद असलेल्या दोन डीपीच्या ठिकाणी नवीन डीपी बसवाव्यात, अशा मागण्या राहुल शिंदे, राहुल कापले, वसंतराव भंडारे व मानसिंग मोरे यांनी केल्या.
कृषी विभागाच्या आढाव्यावेळी रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, भुईमूग आदी पिकांचे अनुदानित बियाणे शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी सदस्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यात प्रत्येक मतदारसंघातून दोन शेतकऱ्यांचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने देगाव रोडवरील व्यावसायिकांची अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील अनेक पशुदवाखाने नियमितपणे उघडले जात नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. पशुधनाचे संरक्षण होण्यासाठी पशुदवाखाने नियमित सुरू ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, पंचायत समितीला प्राप्त झालेला निधी सभापती महेश गाडे यांनी कोणताही भेदभाव न करता सर्व सदस्यांना समान पद्धतीने वाटप केल्याबद्दल उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.