

मारूल हवेली : कराड - पाटण मार्गावरील निसरे फाटा ( ता.पाटण) येथे सोमवार दि.२५ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने उभ्या असलेल्या नागरिकांवर अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात चार जणांना कुत्र्याने चावा घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी निसरे फाटा येथील काही स्थानिक नागरिक तसेच प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. यावेळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक नागरिकांच्या दिशेने धाव घेत हल्ला करण्यास सुरुवात केली. नागरिकांना काही समजण्याच्या आतच कुत्र्याने काही जणांचा हात व पाय चावा घेतला. या घटनेत एका वृद्ध महिलेवरही कुत्र्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. जखमींवर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, निसरे फाटा तसेच परिसरातील गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ते, बसथांबे, बाजारपेठ तसेच गावातील वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भटकी कुत्री फिरताना दिसून येत आहेत. यापूर्वीही परिसरात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांचा पाठलाग करणे तसेच हल्ला करण्याच्या घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वारांना या भटक्या कुत्र्यांचा धोका अधिक जाणवत आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत असून संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.