पोवईनाक्यावर शिवतीर्थाशिवाय काही नको : राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले

पोवईनाक्यावर शिवतीर्थाशिवाय काही नको : राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  पोवई नाका परिसरात शिवतीर्थाशिवाय अन्य काही नको, अशी आक्रमक भूमिका राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी घेतली असून त्यांनी मंगळवारी शिवतीर्थ परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सातारा पालिका अधिकार्‍यांना सूचना केल्या. दरम्यान, शिवतीर्थावर छत्रपती संभाजी महाराज तसेच शाहू महाराज (पहिले) यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.

सातार्‍यातील पोवई नाका-शिवतीर्थ परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावे चौक विकसित करून सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दि. 16 रोजी अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक बोलावली आहे. याबाबतचे वृत्त दै. 'पुढारी'ने मंगळवारी प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी पोवई नाका परिसराची पाहणी केली. यावेळी जि.प.चे माजी सभापती सुनील काटकर, साविआचे प्रतोद अ‍ॅड. डी. जी. बनकर, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, पंकज चव्हाण, सिने अभिनेते समृद्धी जाधव तसेच शिवप्रेमी उपस्थित होते.

यावेळी रंजना रावत म्हणाल्या, पोवई नाका शिवतीर्थावरील शिवप्रभूंचे स्मारक प्रेरणास्थान आहे. शिवप्रभूंपेक्षा दिगंत किर्तीचे कोणी होईल किंवा कोणी असेल असे वाटत नाही. याठिकाणी अन्य कोणाच्या नावाने काही करण्याचे धाडस करू नये. अधिकार गाजवून तमाम जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा कोणी हीन प्रकार करत असेल तर तो जनतेच्या माध्यमातून हाणून पाडला जाईल. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने नगरपालिकेच्या माध्यमातून शिवतीर्थाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. शिवस्मारक परिसर सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. प्रेरणास्थान असलेल्या ठिकाणी अन्य महापुरूषांचे स्मारक किंवा आयलँड करण्याचा कोणी घाट घालत असेल तर तो जनतेच्या अस्मितेवर घाला असेल. स्वराज्याचे शिल्पकार शिवप्रभूंचे कर्तृत्व झाकोळले जाईल, असा प्रयत्न कुणी करत असेल तर तो हाणून पाडला जाईल. लोककल्याणकारी शिवप्रभूंची तुलना अन्य कुणाशी होवू शकणार नाहीच पण तसा प्रयत्नही करू नये, असा इशारा त्यांनी दिला.

रंजना रावत म्हणाल्या, शिवस्मारक परिसरात छत्रपती संभाजी महाराज तसेच शाहूनगरीचे संस्थापक, अटकेपार झेंडा फडकवणारे छत्रपती शाहू महाराज (पहिले) या ऐतिहासिक महापुरूषांची स्मारके उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सातारकर कुटील डाव उधळतील..

आमचा कुणाला विरोध नाही, पण या संकल्पित स्मारकांना आणि शिवस्मारकास अडचणीचे ठरेल, असे कृत्य शिवस्मारक भूमीमध्ये होऊ दिले जाणार नाही. शिवस्मारक परिसराचे पावित्र्य जतन करण्याचे आणि ते उत्तरोत्तर वर्धिष्णू करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी ही जबाबदारी पार पाडतील अशी अपेक्षा आहे. शिवप्रभूंच्या स्मारकाचा अवमान होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास तो सातारकर उधळवून लावतील, असा इशारा रावत यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news