Satara Politics : सातारा नगराध्यक्षांची विकास व समन्वयाची कसोटी

मोहितेंकडून लोकाभिमुख कारभाराची अपेक्षा : विकासावर एकमत घडवण्याचे आव्हान
Satara Politics
सातारा नगराध्यक्षांची विकास व समन्वयाची कसोटी
Published on
Updated on

सातारा : सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच अमोल मोहिते यांच्यासमोर केवळ अधिकारांचेच नव्हे, तर अपेक्षांचेही मोठे ओझे आहे. साताऱ्याच्या बदलत्या गरजा, वाढती लोकसंख्या, हद्दवाढ भागातील मुलभूत प्रश्न आणि राजकीयदृष्ट्या संमिश्र सभागृह अशा पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या विकासाची दिशा ठरवण्याची जबाबदारी आता नगराध्यक्ष म्हणून मोहितेंकडे आहे. शहराच्या दैनंदिन प्रशासनापासून दीर्घकालीन विकास आराखड्यापर्यंत तसेच सहकारी नगरसेवक, विविध राजकीय गट आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचे आव्हान त्यांच्या पुढे उभे ठाकले आहे.

Satara Politics
Satara Politics: सातारा पालिकेत सत्ता भाजपची पण वर्चस्व कुणाचे?

नगराध्यक्षपद हे कार्यक्रम किंवा समारंभात मिरवायचे पद नसून शहर कारभाराच्या विकासाचा केंद्रबिंदू असते. साताऱ्याच्या ऐतिहासिक आणि विस्तारत चाललेल्या शहरात नगराध्यक्षांची भूमिका अधिक व्यापक व महत्त्वाची ठरते. पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधा या मुलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेणे ही नगराध्यक्षांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेषत: हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागांतील नागरिकांना मुख्य शहरासारख्या सुविधा देणे, हा साताऱ्याच्या विकासातील कळीचा मुद्दा आहे. या भागांतील पाणी, ड्रेनेज, रस्ते आणि विद्युत व्यवस्था अद्याप अपुरी असल्याने नगराध्यक्षांना स्वतंत्र कृती आराखडा आखावा लागणार आहे.

नागरिकांचे हित जपताना पारदर्शक आणि जबाबदार कारभार ही लोकसत्तेची अपेक्षा असते. कररचना, विकासकामांचे टेंडर, निधीचे नियोजन आणि खर्च यामध्ये पारदर्शकता राखणे हा नगराध्यक्षांचा कस लावणारा भाग आहे. शहरातील नागरिकांना प्रशासन जवळचे वाटावे, यासाठी प्रयत्न करणे, वॉर्डावॉर्डात संवाद वाढवणे आणि निर्णयप्रक्रियेत लोकसहभाग वाढवणे हे शहर प्रशासनाचे महत्त्वाचे घटक मानले जातात. अमोल मोहितेंकडून हीच अपेक्षा आहे.

सहकारी नगरसेवकांच्या दृष्टीने नगराध्यक्ष हे समन्वयक असतात. सातारा पालिकेच्या सभागृहात विविध राजकीय गट, अपक्ष, बंडखोर नगरसेवक असणार आहेत. अशा स्थितीत सर्वांना विश्वासात घेऊन कारभार चालवणे, मतभेदांवर मात करून विकासासाठी एकत्र आणणे ही नगराध्यक्षांची राजकीय आणि प्रशासकीय कसोटी ठरणार आहे. विषय समित्या, स्थायी समिती, सभापती आणि स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांमध्ये संतुलन राखणे, हेही त्यांच्या नेतृत्व कौशल्याचे मोजमाप ठरणार आहे. पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन सातारा शहर प्रथम हा दृष्टिकोन स्वीकारला तरच साताऱ्याचा विकास वेग घेऊ शकतो.

शहराच्या समाजिक आणि सांस्कृतिक अंगालाही नगराध्यक्षांना तितकेच महत्त्व द्यावे लागणार आहे. सातारा हे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. सार्वजनिक उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा सुविधा, उद्याने आणि सार्वजनिक जागांचे जतन व संवर्धन, यांमुळे शहराचे सामाजिक स्वास्थ्य टिकते. त्याचबरोबर, महिलांची सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, दिव्यांगांसाठी सुलभता आणि तरूणांसाठी रोजगार व कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करणे, याही नगराध्यक्षपदाकडून अपेक्षा आहेत.

आरोग्य आणि स्वच्छता हा शहरी जीवनाचा कणा आहे. शहरातील दवाखाने किंवा नव्याने होऊ घातलेली आरोग्य केंद्रे, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालये यांची स्थिती सुधारण्याची जबाबदारी नगराध्यक्षांवर आहे. कोरोना महामारीनंतर आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले असून साताऱ्यात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि स्वच्छतेवर भर देणे आवश्यक ठरणार आहे. पर्यावरणपूरक धोरणे, वृक्षारोपण, जलसंधारण आणि प्रदूषण नियंत्रण यांनाही प्राधान्य द्यावे लागेल. अमोल मोहिते यांच्यासाठी नगराध्यपद ही पदाची जबाबदारी असली तरी शहराच्या भवितव्याशी जोडणारी महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नागरिकांच्या अपेक्षा, सहकारी नगरसेवकांचे राजकीय गणित आणि वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यांचा समतोल साधत साताऱ्याला विकासाच्या मार्गावर नेणे, हीच त्यांच्या कार्यकाळाची खरी कसोटी ठरणार आहे. सातारा शहराच्या विकासासाठी निर्णयक्षमता, समन्वय आणि लोकभिमुख नेतृत्वाची असलेली संधी कितपत साध्य होते, याकडे सातारकरांचे व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची गरज

नेत्यांच्यादृष्टीने नगराध्यक्ष हा शहराचा चेहरा असतो. राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यासाठी साताऱ्याच्या गरजा प्रभावीपणे मांडणे, विविध योजनांचा लाभ शहराला मिळवून देणे आणि विकास प्रकल्पांची गती वाढवणे, ही जबाबदारी त्यांच्यावर असते. पाणीपुरवठा योजना, अमृत स्मार्ट सिटी संकल्पना, रस्ते व पायाभूत सुविधा तसेच पर्यावरणपूरक उपक्रम यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे हे नगराध्यक्षांचे महत्त्वाचे काम ठरेल. सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि इतर विभागांशी समन्वय राखून प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

Satara Politics
Satara politics : नगरसेवकपदाचा उमेदवार बिले काढणारा नसावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news