

सातारा : जपानमध्ये सुरू असलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल ४४ वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावले. चीनविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. या विजयात फलटण तालुक्यातील कोळकीची सुकन्या ऋतुजा दादासाहेब पिसाळ हिनेही मोलाचे योगदान दिले. ऋतुजाच्या या कामगिरीमुळे कोळकी ता. फलटण आणि सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव झाला आहे.
ऋतुजाने जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असतानाच हॉकी खेळाला सुरुवात केली. खेळातील गुणवत्ता आणि मेहनतीच्या जोरावर पुढे तिची क्रीडा प्रबोधिनीमध्ये निवड झाली. तेथे मिळालेल्या प्रशिक्षणामुळे तिच्या खेळाला अधिक धार आली. विविध स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत तिने राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आणि अखेर भारतीय महिला हॉकी संघात स्थान मिळवले.
चीनविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऋतुजाने बचावासोबतच आक्रमणातही प्रभावी भूमिका बजावली. प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करताना तिने वेग आणि चेंडूवरील नियंत्रणाचा योग्य वापर केला. भारतीय खेळाडूंच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने सुवर्णपदकाला गवसणी घातली. कोळकीसारख्या ग्रामीण भागातून हॉकीची सुरुवात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्यापर्यंतचा ऋतुजाचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. तिच्या या यशामुळे कोळकी, फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून क्रीडाप्रेमींकडून ऋतुजाचे अभिनंदन होत आहे.