

Kas Dam drowning incident
सातारा : कास धरणात बुडून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राकेश विश्वकर्मा असे मृत मुलाचे नाव आहे. सातारा राजवाडा परिसरातून एकूण ३० लोकांचा ग्रुप उन्हाळी सुट्ट्या असल्याने आपल्या मुलांसह फिरण्यासाठी कास तलाव परिसरात गेले होते. त्या ठिकाणी फिरत असताना त्यांच्या ग्रूप मधील काही मुले सायंकाळी चारच्या सुमारास कास बंगल्या जवळ क्रिकेट खेळत होती. एकाने मारलेला बॉल तेथील कास तलावाच्या पाण्यात गेला.
तो बॉल आणण्यासाठी राकेश नावाचा मुलगा त्या ठिकाणी गेला. मात्र बॉल खोल पाण्यात असल्याने त्या मुलाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. त्यानंतर तेथील स्थानिक ग्रामस्थांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मिळून आला नाही. याची माहिती सातारा येथील शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रेकर्स टीमला देण्यात आली.
सायंकाळच्या सुमारास ट्रेकर्स टीम मधील सदस्य त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थ व त्या ठिकाणी असलेले पर्यटक यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर राकेश विश्वकर्मा याचा मृतदेह तलावा बाहेर काढण्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रेकर्स टीमला यश आले.
ट्रेकर्स टीमच्या वतीने कास परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना असे आवाहन करण्यात येते की, कास तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी या परिसरात ठीक ठिकाणी मोठे खड्डे काढून त्याची माती कासच्या भिंतीसाठी वापरण्यात आली आहे. त्यामुळे कास तलाव परिसरात असणाऱ्या पाण्याच्या खोलीचा अंदाज येणाऱ्या पर्यटकांना येत नसल्याने ही घटना घडली आहे. त्यामुळे इथून पुढे कास परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी पाण्यात उतरताना आपल्या लहान मुलांची काळजी घ्यावी व अशा घटना होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
घटनास्थळी मेढा पोलीस ठाण्याचे अधिकारी पोहचले असून अधिक तपास सुरू आहे. नऊ वर्षीय युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.