

सातारा : गोडोली येथे मान्सूनपूर्व पडलेल्या मुसळधार पावसाने अजिंक्यताऱ्यावरून वहात येणाऱ्या ओढ्याला अचानक महापूर आल्याने अनेक घरात पाणी शिरले. यामुळे काही घरांच्या भिंती पडल्या तर पायरीप्लाझा येथील जवळपास 48 दुकानात पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले. या परिस्थितीला सातारा नगरपालिकेचा भोंगळ कारभार जबाबदार असक्याचा आरोप व्यावसायिकानी केला.
दरम्यान, विलासपूरमध्ये कल्याण पार्क येथे अनेक दुकानात पाणी शिरल्याने पाणी काढताना व्यावसायिकांची तारांबळ उडाली. तसेच याच इमारतीची ओढ्या लगत असलेली संरक्षक भिंत ढासळल्याने नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती आशी, सातारा येथील गोडोलीत अनेक नागरिक वसाहतीमधून कळंबीचा ओढा वहात गेला आहे. या ओढ्यावरती अनेकांनी अतिक्रमणे करून बंगले बांधले आहेत. दरवर्षी मान्सूनपूर्व पावसात या ओढ्याला पूर येऊन अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, गोडोली येथे कळंबीच्या ओढ्यावरील पाईप अरूंद टाकण्यात आल्याने पालवी हॉटेल समोरील ओढ्याचे पात्रातील पाणी रस्त्यावर वहात असल्याने पालवी हॉटेल ते जगदेव कॉर्नर पर्यंतच्या रस्त्यावर गुढघाभर पाणी साचले. यामुळे काही काळ वहातूक ठप्प झाली. दरम्यान या पुराचे पाणी पायरी प्लाझामधील जवळपास 48 व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरले. त्यामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडाली. हळूहळू अनेक दुकानात गुढघाभर पाणी साचल्याचे पहायला मिळाले. यामुळे अनेक व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
याच रस्त्यावरून वाहणारे पाणी धनलक्षमी मंगल कार्यालय, अक्षदा मंगल कार्यालयात व एका रंगाच्या दुकानात शिरले. दरम्यान साईबाबा मंदिर चौकात रस्त्यावरील पाणी रस्तालगतच्या दुकानात पाणी शिरल्याने पाणी काढताना व्यावसायिकांची धांदल उडाली होती. नगरपालिकेने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.