Satara Car Fire: धावती इर्टिगा कार महामार्गावरच पेटली; आनेवाडीजवळ शॉर्टसर्किटने दुर्घटना

चौघांचा जीव बचावला
Satara Car Fire
Satara Car Fire
Published on
Updated on

लिंब : सातारा-पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी गावच्या हद्दीत साताऱ्याहून पुण्याकडे निघालेल्या इर्टिगा कारला अचानक आग लागून कार पूर्णपणे जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळून चौघांचेही प्राण बचावले.

गणेश आनंदराव शिंदे (रा. आसगाव, ता. कोरेगाव) हे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह एमएच ११ डीझेड ३१६८ क्रमांकाच्या इर्टिगा कारने साताऱ्याहून पुण्याकडे निघाले होते. आनेवाडी गावच्या हद्दीत, टोलनाक्याजवळ आल्यानंतर अचानक कारमधून धूर येऊ लागला. कारमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे लक्षात येताच गणेश शिंदे यांनी प्रसंगावधान राखत कार तातडीने महामार्गाच्या बाजूला घेतली. त्यानंतर कारमधील तिघांना सुरक्षितपणे खाली उतरवले. प्रवासी खाली उतरल्याच्या काही वेळातच कारमधून मोठ्या प्रमाणात ज्वाला भडकल्या. पाहता पाहता आगीने संपूर्ण कारला वेढले आणि काही वेळातच कार जळून पूर्णपणे खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच भुईंज महामार्ग विभागाचे फौजदार हेमंत शिंदे, पोलीस हवालदार संतोष ननावरे, अनिकेत जाधव, अभिजित पवार, ओमकार कांबळे, रोहित भोसले व मंदार शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारी म्हणून महामार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडने वळवली. महामार्गावर वाहनांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असताना आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन यंत्रणा तातडीने उपलब्ध होणे गरजेचे आहे.

टोलनाक्याजवळ कायमस्वरूपी अग्निशमन यंत्रणेची मागणी

आनेवाडी टोलनाका हा सातारा-पुणे-बंगळूर महामार्गावरील महत्त्वाचा टोलनाका आहे. या परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. वाहनांना आग लागणे, अपघात किंवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास मदत मिळण्यास विलंब होऊ नये, यासाठी टोलनाका परिसरात अत्याधुनिक अग्निशमन वाहन व आवश्यक उपकरणांसह स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाहनधारक व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news