

कराड : मोठा गाजावाजा करून शासन अनेक योजना सुरू करते; पण त्याच्या अडचणींचा सामना मात्र योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे अधिकारी व कर्मचार्यांना करावा लागतो. महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचे असेच त्रांगडे झाले आहे. तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणींचे फॉर्म अपलोड होईनात, तर दोन आठवड्यांपासून सर्व्हर डाऊन असल्याने रेशन धान्य वितरण व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे.
महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या माझी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक अडचण सर्वत्र निर्माण झाली आहे. त्यामुळे या योजनेचे नवीन फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सध्या ठप्प आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोय आहे. मात्र, ज्या अॅप्लिकेशनवर अर्ज सादर करायचे तेच अॅप ‘सर्व्हर डाऊन’मुळे व्यवस्थितरीत्या चालत नाही. मध्यरात्री अर्ज भरावे लागत आहेत. तसेच ओटीपीसाठी त्यांना रात्रीचीच फोनाफोनी करावी लागत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभधारक महिलांना प्रतीमहा 1 हजार 500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी महिला अर्ज करीत आहेत. सुरुवातीला या योजनेचे अर्ज भरण्याबाबतची निश्चित प्रक्रिया ठरविण्यात आली नव्हती. आवश्यक दाखले काढण्यासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने शासनाने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ‘नारीशक्ती’ अॅप उपलब्ध करून दिले. या अॅपच्या माध्यमातून हजारो महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत; मात्र आठ दिवसांपासून ‘नारीशक्ती’ हे अॅप सुरूच नसल्याने नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या ठप्प झाली आहे. महिला मात्र गोंधळलेल्या स्थितीत आहेत. सर्वत्र हीच तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रक्रिया कधी सुरू होईल, हे अधिकार्यांनाही खात्रीने सांगता येत नाही.
दरम्यान, रेशन धान्य वितरण व्यवस्थेचेही कामकाज विस्कळीत झाले आहे. 21 जुलैपासून रेशन दुकानदार या अडचणींचा सामना करत आहेत. सर्व्हर डाऊन असल्याने केवायसी होत नाही. शिवाय पॉस मशिनद्वारे धान्य देता येत नाही. त्यामुळे रेशन धान्य वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे. यानंतर कधी सर्व्हर सुरू, तर कधी बंद असतो. त्यामुळे गोरगरीब जनता रेशन धान्यापासून वंचित राहिली आहे. लाभार्थी रोज रेशन दुकानात हेलपाटे मारत आहेत; पण रेशन बंद आहे एवढेच त्यांना सांगितले जात आहे.
कराड तालुक्यात 288 रेशन दुकाने आहेत. 78 हजार कार्डधारक आहेत. यात अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंबांचा समावेश आहे. यांना रेशन धान्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्यभर ही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे पुरवठा शाखेतून सांगण्यात आले.