

सातारा : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दीपोत्सवाचा प्रारंभ दि. ६ नोव्हेंबर रोजी गोवत्सपूजनाने होणार आहे. त्यामुळे अवघ्या जनजीवनाला दीपोत्सवाची आतुरता वाढली आहे. बाजारपेठेतही दीपोत्सवाचा झगमगाट दिसत आहे. दिवाळीनिमित्त नवीन वास्तू, वस्तू, वाहन खरेदीचा शुभमुहूर्त साधणार असल्याने बाजारपेठेचा आढावा घेण्यासाठी धांदल उडाली आहे. त्यामुळे सातारा शहर व परिसरातील रस्ते गर्दीने फुलू लागले आहेत. सजावट, इलेक्ट्रीक वस्तू, कपडे, भुसार मालासह सर्वत्रच होणार्या आर्थिक उलाढालीमुळे व्यावसायिक झळाळी येवू लागली आहे. पुढील काही दिवसांमध्ये ही झळाळी आणखी वाढणार आहे.
निराशेचे मळभ दूर करुन आनंद व मांगल्याचा प्रकाशाचा पसरवत दिवाळीचा सण साजरा होत आहे. सर्वत्र दिवाळीची जय्यत तयारी सुरु असून बाजारपेठेत दिवाळीच्या सहित्याची रेलचेल वाढली आहे. त्यामुळे सर्वत्र दिपोत्सवाचा माहोल तयार झाला आहे. वसुबारसेने सुरु होणार्या दिपोत्सवामध्ये शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी नरक चतुदर्शी, अभ्यंग स्नान व लक्ष्मीपूजन, मंगळवार दि. १० रोजी बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा, बुधवार दि. ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर दिपोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरु झाली आहे. घरोघरी दिवाळीची जय्यत तयारी सुरु झाली आहे. दिवाळीचा सण सर्व स्तरातील नागरिकांमधून आपापल्यापरीने साजरा केला जाणार आहे. महिला वर्गामध्ये दिवाळी फराळाच्या पूर्वतयारी व खरेदीची लगबग सुरु आहे. वाणसामानाची यादी तयार करणे, आचार्याचे बुकींग, रांगोळी, साजारवट साहित्याची जमवाजमव करण्यासाठी धांदल उडाली आहे. बाजारपेठेसह सर्वच ठिकाणी दिपोत्सवाचा उत्साह जाणवू लागला आहे. तोरणे, आकाश कंदिल, पणत्या, शोभेच्या वस्तू, कपडे व इतर साहित्याची रेलचेल वाढली असून व्यावसायिकांकडून विविध ऑफर्सचा वर्षाव केला जात आहे. त्याचा फायदा उठवत अभ्यंग स्नानासह लक्ष्मीपूजन व दिवाळी पाडवा, भाऊबीजेच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र खरेदीसाठी तोबा गर्दी होत आहे. सातारा शहर व परिसरातील रस्ते नागरिकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. मुख्य बाजारपेठेसह सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
हस्तकला अन् कलाकुसरीला प्रोत्साहन...
दिवाळीमध्ये घरोघरी वापरल्या जाणार्या पूजा व सजावट साहित्यामध्ये हस्तकला व कलाकुसरीच्या साहित्याची रेलचेल अधिक आहे. मोत्यापासून तयार केलेल्या पणत्या, पणत्या स्टॅण्ड, आकाश कंदिल, शुभचिन्हे, हळदी-कुंकाचे करंडे, तसेच लोकरीपासून तयार केलेले आकाश कंदिल, तोरणे, शुभ दिपावलीचे वॉलहँगीग, तुळशी वृंदावन आदी साहित्य विशेष लक्ष्य वेधत आहे. दीपोत्सवाच्या निमित्ताने हस्तकलेला प्रोत्साहन मिळत असून त्यातून निर्मित साहित्याला खरेदीमध्ये चांगली पसंती मिळत आहे.