Satara District Bank- जिल्हा बँकेत अतुलबाबा पुन्हा ठरले किंगमेकर!

उदयसिंह पाटील – उंडाळकरांच्या विजयात निर्णायक भूमिका; दिलेला शब्द पाळत समर्थकांची मते वळवली
 Satara District Bank
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून आल्यानंतर उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कृष्णा कॅम्पस येथील सहकार महर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
Published on: 
Updated on: 

कराड : चंद्रजित पाटील

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या विजयामागे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची भूमिका निर्णायक ठरली. मागील निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले अतुलबाबा यंदाही किंगमेकर ठरले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात 'ज्यांच्या बाजूने अतुलबाबा, त्यांचाच विजय' हे समीकरण पुन्हा अधोरेखित झाले आहे.

आमदार भोसले यांचे समर्थक म्हणून ओळख असलेले ३२ ठरावधारक मतदानास पात्र होते. त्यांचे निकटवर्तीय भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा कराड पंचायत समिती सदस्य पैलवान धनाजी पाटील यांनी उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्याविरोधात निवडणूक लढविल्याने आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. चार महिन्यांपूर्वी कृष्णा कारखाना निवडणुकीवेळी डॉ. सुरेश भोसले व आमदार अतुलबाबा यांनी जिल्हा बँक निवडणुकीत मदतीचा शब्द दिला होता. त्यानुसार समर्थकांनी उंडाळकरांना मतदान केल्याचे निकालातून स्पष्ट झाले. तसेच पंचायत समिती सदस्य पै. धनाजी पाटील यांनी ४४ मते मिळवत आपली ताकद दाखवली.

२०२१ मध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांना तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पराभूत केले होते. त्यावेळीही अतुलबाबांची भूमिका निर्णायक होती. या निवडणुकीत सुद्धा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची भूमिका निर्णायक ठरली असून तेच सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील किंगमेकर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याशिवाय स्वतः प्रथमच सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात उतरत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळेच जिल्हा बँकेतील राजकारणावर कराड तालुक्यातील आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची पकड अधिक घट्ट झाली आहे.

मोहिते-भोसले कुटुंबाला दुसऱ्यांदा संधी...

१९८० च्या दशकात यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते हे सातारा जिल्हा बँकेवर निवडून गेले होते. त्यानंतर मागील चार दशके मोहिते-भोसले कुटुंबीय सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून दूर राहिले होते. मात्र, आता आमदार अतुलबाबा भोसले हे बिनविरोध विजयी झाल्याने पुन्हा एकदा मोहिते-भोसले कुटुंबातील सदस्य सातारा जिल्हा बँकेत कराड तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.

 Satara District Bank
Satara Crime | सातार्‍यातील तिघांची टोळी तडीपार

ही ठरली निवडणुकीची वैशिष्ट्ये...

निकटचा सहकारी निवडणूक लढवत असूनही दिलेला शब्द प्रमाण मानत आमदार अतुलबाबा भोसले यांनी उदयसिंह पाटील उंडाळकर यांना मदत केली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उदयसिंह पाटील यांच्या विजयासाठी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले प्रयत्नशील होते. दुसरीकडे भाजपचे पंचायत समिती सदस्य आणि आमदार अतुलबाबांचे निकटवर्तीय मानले जाणारे पैलवान धनाजी पाटील यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हीच या निवडणुकीची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली.

 Satara District Bank
Satara News : हॉटेलवर दहशतवादी हल्‍ल्‍याचा ‘लेटर’ बॉम्‍ब

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.