Satara Crime | सातार्‍यातील तिघांची टोळी तडीपार

संशयित प्रतापसिंहनगरचे : एसपींचा दणका
तडीपार
तडीपारPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा शहर परिसरात सातत्याने शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणार्‍या टोळीला पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दणका देत तडीपार केले. संशयित टोळी प्रतापसिंहनगर येथील आहे. जीवन महादेव गायकवाड (वय २९), अनिकेत बापू गायकवाड (२९), सुनील सुभाष गायकवाड (३२ सर्व रा. प्रतापसिंहनगर, खेड, सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

संशयितांवर विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. या टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसावा यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोनि सचिन म्हेत्रे यांनी या टोळीचा तडीपारीचा प्रस्‍ताव तयार करुन तो पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला. या टोळीतील संशयितांवर गुन्‍हे दाखल झाल्‍यानंतर पोलिसांनी वेळोवेळी अटक करुन त्‍यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली होती. मात्र या टोळीने गुन्हेगारी कारवाई सुरुच ठेवल्‍या होत्‍या. टोळीवर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे सर्वसामान्‍य नागरिकांना उपद्रव होत होता. या टोळीवर कायद्याचा वचक राहावा यासाठी सर्वसामान्य नागरिकामधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.

संशयितांची सुनावणी हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक पिंगळे यांच्या समोर चालली. संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून ४ महिन्‍यांसाठी त्‍यांना तडीपार केले. जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाई करण्यात येणार आहेत. हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोनि विश्वजीत घोडके, पोलिस प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अनुराधा सणस, दीपक इंगवले, संदीप पवार यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.