Satara News: खड्ड्यांत हरवला ढेबेवाडी घाटरस्ता

वाहनचालकांचा जीवघेणा प्रवास : बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
Satara News: खड्ड्यांत हरवला ढेबेवाडी घाटरस्ता
Published on
Updated on

मारूल हवेली : पाटण तालुक्यातील महत्त्वाचा आणि डोंगराळ भागाला जोडणारा ढेबेवाडी घाट रस्ता सध्या खराब अवस्थेत असून वाहनचालकांसह प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, त्यामध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

ढेबेवाडी परिसरातील अनेक गावांतील नागरिकांसाठी हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच पाटण या तालुक्याच्या ठिकाणाला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. मात्र, घाट परिसरातील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले असून रस्त्याच्या कडेला माती व खडी वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी रस्त्याला तडे गेले असून पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. तसेच अनेक ठिकाणी साईड पट्ट्या खचल्या आहेत.

विशेषतः दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. घाट रस्ता असल्याने एका बाजूला डोंगर उतार आणि दुसऱ्या बाजूला वळणावळणाचा मार्ग असल्यामुळे खराब रस्त्यामुळे धोका आणखी वाढला आहे.

या मार्गावरून विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यापारी तसेच रुग्णवाहिका, एसटी बस आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहने नियमितपणे ये-जा करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवासाचा वेळ वाढत असून वाहनांचे नुकसानही होत आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतच असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन खड्डे बुजविणे, खराब डांबरीकरणाची दुरुस्ती करणे, रस्त्याच्या कडेला संरक्षणात्मक उपाययोजना करणे आणि घाट रस्त्याचे दर्जेदार मजबुतीकरण करावे, अशी मागणी प्रवाशी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news