Satara Crime| चिमणी-पाखरांनो, नका ‘असे’ वागू

पालकांनो मुलांना द्या वेळ : खून सत्राने जिल्ह्यातील अवघे समाजमन सुन्‍न
Satara Crime News
Satara Crime News
Published on: 
Updated on: 

विठ्ठल हेंद्रे

सातारा : सातारा जिल्‍ह्यात सलग दोन घटनांमध्ये जन्‍मदात्‍या पित्‍यांकडून ‘टीनऐज’ असणार्‍या मुलींचा मारहाणीत मृत्‍यू झाल्‍याने समाजमन सुन्‍न झाले आहे. व्‍यसन, हिंस्‍त्र स्‍वभाव, हट्टीपणा यामुळे चिमणी-पाखरांसमान असणार्‍या पोरींचा घोट घेण्याची वेळ पालकांवर येत आहे. ‘पोरांनाे तुम्‍ही असं वागू नका, पालकांनो तुम्‍हीही मुलांना वेळ द्या’, तरच अशा घटना कुठतरी थांबतील, पर्यायी मार्ग निघणार असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

कुटुंबातील वादानंतर साताऱ्यात जन्मदात्या पित्याने केलेल्या मारहाणीत १७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला तर शिरवळ हद्दीत १९ वर्षाच्या मुलीचा वडील व चुलत्याने खून केला. या दोन्ही घटनांमधील कारणे समाजमन अस्वस्थ करणारी आहे. या घटना अनेक कुटुंबांमध्ये असलेल्या अंतर्गत कलहाचे द्योतक आहेत. समाजात सध्या विशीत असलेल्‍या मुला-मुलींच्या वागण्याचा बहुतांशी पालकांना त्रास होत आहे. हा त्रास अचानक सुरु होत नाही. पहिल्‍यांदा काही बाब समोर आल्‍यानंतर ‘मुलांमध्ये लगेच सुधारणा व्‍हायला पाहिजे,’ असा मूड पालकांचा आहे. मात्र कोणतीही बिघडलेली गोष्ट लगेच दुरुस्‍त होत नाही. त्‍यासाठी पालकांनी पाल्‍यांना वेळ देणं हे क्रमप्राप्‍त बनते.

योग्य तो विश्वास देवून सुसंवाद साधल्‍यास बिघडलेल्‍या, बिघडत चाललेल्‍या बाबी सावरु शकतात. मोबाईलवर काय पाहतात. कोणाशी अधिक बोलतात. साेशल मीडिया किती वापर होतो. सर्वात महत्‍वाचे आपल्‍या मुला-मुलींची संगत काेणाबरोबर आहे? याची माहिती असायलाच पाहिजे ही पालकांसाठी आता काळाची गरज बनली आहे. याबाबी माहिती नसेल तर खूनासारख्या घटना त्‍याची जागा घेणार हेच भीषण वास्‍तव समोर येत आहे.

हर्षदाला लागले होते व्यसन...

पाच दिवसांपूर्वी पुणे येथील हर्षदा वय १९ या युवतीचा खुनाचा उलगडा सातारा पोलिसांनी केला. वडील व चुलत्‍यांनी तिचा खून करुन मृतदेह शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत टाकल्‍याची घटना समोर आली आहे. हर्षदाला व्‍यसन लागले होते. ती आई-वडिलांचे काहीही ऐकत नव्‍हती. सतत कुटुंबीयांसोबत भांडायची. यामुळे आई-वडिलांचे जगणे मुश्‍कील झाले. त्‍यातूनच कारमध्ये घालून तिच्या डोळ्यात, नाका, तोंडात चटणी टाकून तिचा खून केला. हर्षदा ही तिच्या आई-वडिलांना एकुलती एक मुलगी होती.

आर्या आई-वडिलांसमवेत सतत भांडायची

सातार्‍यातील आर्या हिच्या मृत्‍यूचे देखील भयावह वास्‍तव समोर आले आहे. ती रात्रभर मोठ्या आवाजात टीव्‍ही पाहत होती. आई-वडिलांसोबत सतत भांडायची. तिच्यावर समुपदेशन देखील सुरु होते. मात्र तिच्यात सुधारणा फारशी नव्‍हती. घटनेदिवशी रागाच्या भरात आर्याने तिच्याच लहान बहिणीला मारहाण केली. शिक्षक असलेले वडील आर्याला समजावून सांगत असताना तिने बॅट घेवून त्‍यांनाच मारण्याचा प्रयत्‍न केला. रागाच्या भरात वडिलांकडून तिला मारहाण झाली त्‍यातच ती गतप्राण पडली.

‘पुढारी’ने समोर आणली होती वाढती बाल गुन्‍हेगारी

दैनिक ‘पुढारी’ने सातार्‍यातील वाढती बाल गुन्‍हे विस्‍तृतपणे मांडली होती. सातार्‍यातील मुलां-मुलींमध्ये नकाे त्‍या चुकीच्या क्रेझ कशा वाढत आहेत, हे विषद केले होते. इन्‍स्‍टाग्राम अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांचा गुन्‍हेगारी क्षेत्रात कल कसा वाढत आहे. हे समोर आणले होते. प्रत्‍यक्ष गुन्‍हे केलेल्‍या मुलांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी मांडली होती. शाळेतील मुली मोबाईल कशा चोरुन वापरतात, हे देखील दै.‘पुढारी’ने मांडून पालक, पोलिसांमध्ये जनजागृती केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news