

सातारा : राष्ट्रीय काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत अपशब्द वापरल्यावरून सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत रविवारी दुपारी जिल्हाध्यक्षांच्या दालनात तासभर राडा झाला. यात फलटण व कराड येथील पदाधिकारी एकमेकांशी भिडले असून याची दिवसभर चर्चा सातारा शहरात रंगली होती.
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत रविवारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तसेच केंद्र सरकारकडून मनरेगा योजनेच्या बदललेल्या नावासाठी रास्ता रोको करण्याचे नियोजन होते. त्यासाठी जिल्ह्यातून काँग्रेस पदाधिकारी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात दाखल झाले. यादरम्यान जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या दालनात काही पदाधिकाऱ्यांची आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत चर्चा सुरु होती.
यावेळी काँग्रेसचे फटलण तालुकाध्यक्ष महेंद्र बेडके हे दालनात आले. त्यांनी देशमुख यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून काहीच अपेक्षा धरू नका. त्यांनी आता झालेल्या निवडणुकांमध्ये काहीच लक्ष दिले नाही, असे म्हणत तक्रार केली. त्यानंतर कराड कार्यकारणीचे पदाधिकारी प्रशांत पवार यांनी तुम्ही बाबांबद्दल असे कसे बोलू शकता. त्यांच्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस जिवंत आहे, असे सांगितले. यावरून बेडके व पवार यांच्यात तासभर वाद सुरू होता. जिल्हाध्यक्षांच्याच समोर हा वाद झाल्याने याची सातारा शहरासह जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर रणजित देशमुख व काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.