

सातारा : सातारा शहर परिसरात चार दिवसांमध्ये 3 महिलांची फसवणूक करुन चोरट्यांनी सहा तोळेहून अधिक दागिन्यांवर डल्ला मारला. सापडलेले सोन्याचे बिस्कीट वाटून घेवूया, पुढे हाणामारी सुरु आहे, पोलिस तपासणी सुरु आहे, अशी भीती दाखवून हातचलाखीने चोरट्यांनी महिलांचे सोन्याचे दागिने चोरले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यातील पहिली घटना दि. 7 डिसेंबर रोजी घडली आहे. तीन अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. एसटी स्टॅन्ड समोरील भाजी मंडई परिसरात अनोळखी तिघांनी सापडलेले सोन्याचे बिस्कीट आपापसात वाटून घेवू, असे आमिष दाखवून वृध्द महिलेचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण घेवून फसवणूक केली. याप्रकरणी शांताबाई भाऊ देवकर (रा. देवकरवाडी पो.निगडी ता.सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारी कमानी हौद, गुरुवार पेठ परिसरात अशाच पध्दतीने दोन महिलांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी महिलांना विविध प्रकारची भीती दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने काढायला लावले. यानंतर हातचलाखीने ते सोन्याचे दागिने चोरट्यांनी स्वत:कडे ठेवले. काही क्षणात घडलेल्या या घटनेनंतर गुरुवार पेठ परिसरात महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. यातील काही तक्रारदार महिलांनी उशीरा पोलिस ठाण्यात जावून पोलिसांना माहिती दिली. एकापाठीमागे एक महिला पोलिस ठाण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली.
वृध्द महिला तसेच परिस्थितीचा गैरफायदा घेवून महिलांना फसवणारी टोळी सातार्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. दोन दिवसांपूर्वी शाहूपुरी परिसरात घरात घुसून महिलेच्या तोंडावर स्प्रे मारुन बेशुध्द करत सोन्याचा ऐवज लांबवला गेला आहे. यामुळे सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे. तत्काळ याचा छडा लावावा, अशी मागणी सातारकरांकडून होत आहे.