

सातारा :चोरलेली चारचाकी विक्रीसाठी साताऱ्यात आलेल्या दोघांच्या टोळीला शहर पोलिसांनी जेरबंद केले. संशयित दोघेही कोरेगाव, जि. सातारा येथील असून दोघांकडून सातारा, दहिवडी व पुणे येथील 5 गुन्ह्यांची उकल झाली आहे. पोलिसांनी 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. प्रणव अरुण पवार (वय 32, रा.किन्हई), चंद्रकांत विठ्ठल जाधव (वय 28, रा. जांब खुर्द, दोन्ही ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, सातारा एमआयडीसी येथे चोरीची वाहने विक्री करण्यासाठी संशयित येणार असल्याने पोलिसांनी धनगरवाडी ते बिरोबा मंदिर रोडलगत सापळा लावला. रात्री 8 च्या सुमारास संशयित विनाक्रमांकाची पिकअप पोलिसांनी थांबवली. मात्र, अंधाराचा गैरफायदा घेऊन दोघे संशयित पळून गेले. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले. तर संशयितांना अतीत, ता. सातारा येथून उचलले. दोन्ही संशयितांनी संबंधित वाहन कुळकजाई, ता. माण येथून चोरल्याचे कबूल केले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलिस सुजीत भोसले, नीलेश जाधव, नीलेश यादव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, संतोष घाडगे, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, आशिकेष डोळस, सुहास कदम, सुशांत कदम, मच्छिंद्रनाथ माने, वैभव माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.
किरकोळ विक्रेत्याला न्याय मिळाला
तीन दिवसांपूर्वी हातावरचे पोट असलेल्या फिरस्त्या साडी विक्रेत्याच्या साड्या, मोबाईल व रोकड यांची चोरी झाली होती. यामुळे साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील किरकोळ विक्रेत्यावर आभाळ कोसळले होते. पोलिसांना रडून तो सर्व हकीकत सांगत होता. पोलिसांनी पिकअप वाहन विक्रेत्यांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पुणे, दहिवडी तसेच साताऱ्यातील साड्यांची चोरी केल्याची कबुली दिली. अशा प्रकारे किरकोळ विक्रेत्याने पोलिसांकडून न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.