

कराड : तीन अपत्य असल्यास निवडणूक लढविता येणार नाही, याबाबतची पोस्ट व्हॉटस्ॲप ग्रुपवर शेअर केल्याचा राग मनात धरून बनवडी (ता. कराड) येथे एकास मारहाण करण्यात आली आहे. भाजपाचा माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास याच्यासह अन्य दोघांवर याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिवदास याच्यासह पांडुरंग कोठावळे व गणेश जाधव यांच्याविरोधात आख्तरहुरसेन बालेखान आतार (वय 38, केबल व्यवसाय, रा. बनवडी कॉलनी) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबरला रात्री 12.15 वाजता 2 पेक्षा अधिक अपत्य असल्यास निवडणूक लढवता येणार नाही अशी एक बातमी फिर्यादी आख्तरहुरसेन आतार यांच्या मोबाईलवर आली होती.
ही बातमी त्यांनी ‘आपलं गाव’, ‘जनशक्ती’ व ‘बी न्यूज’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केली होती. या बातमीचा राग मनात धरून भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सागर भिमराव शिवदास (रा. बनवडी कॉलनी) हे मंगळवारी सकाळी फिर्यादीच्या घरासमोर येऊन वाद घालू लागले. या वेळी फिर्यादी घराबाहेर आले असता सागर याने व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेल्या बातमीचा राग धरून शिवीगाळ करत परिसरातील एका दुकानातील बोर्डचा अँगल उचलून फिर्यादीच्या उजव्या पायाच्या नडगीवर मारला. याच वेळी पांडुरंग कोठावळे व गणेश जाधव हेही घटनास्थळी आले.
पांडुरंग कोठावळे याने तुला ठेवत नाही तर गणेश जाधव याने तू जगायला आला आहेस असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरडाओरड झाल्यानंतर अन्य लोकांनी भांडण सोडवले. या प्रकरणी सागर भिमराव शिवदास, पांडुरंग कोठावळे व गणेश जाधव यांच्याविरोधात मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जातिवाचक शिवीगाळ केल्याचे म्हणणे...
आख्तरहुसेन आतार यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याची कैफियत सागर शिवदास यांनी मंगळवारी रात्री कराड शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्यापुढे मांडली. आपली सुद्धा तक्रार नोंदवा असा आग्रह शिवदास यांनी पोलिसांपुढे धरला होता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत याबाबतची कार्यवाही सुरू होती.