

सातारा : सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 50 जागांसाठी मतदान झाल्यावर 25 प्रभागांतून निवडून येणार्या उमेदवारांबद्दलचे चित्र काही प्रमाणात स्पष्ट होऊ लागले आहे. सातारा पालिकेत भाजपची सत्ता येणार असल्याचे वातावरण दिसत असले तरी बंडखोर व इतर पक्षांचेही उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या वर्चस्वाला धक्का बसणार असल्याचेही नागरिकांच्या चर्चेतून स्पष्ट होत आहे.
बंडखोरीचा भाजपच्या 10 जागांना फटका बसणार असून शिवसेना शिंदे गटाला 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंडखोरांना 10 ते 12 जागांवर संधी मिळण्याची शक्यता आहे. सातारा पालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 49 उमेदवार उभे केले. मात्र पक्षातील अंतर्गत नाराजी, अधिकृत उमेदवारांविरोधात उभे राहिलेले बंडखोर आणि राजे समर्थकांचे परस्परविरोधी उमेदवार असतानाच इतर प्रादेशिक पक्षांचीही राजकीय समीकरणे जुळल्याने भाजपसमोर तगडे आव्हान उभे राहिले.
सातार्यात खा. उदयनराजे भोसले आणि ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे दोन्ही गट निवडणुकीत एकत्र आले असले तरी स्थानिक पातळीवर बंडखोरीमुळे पक्षीय समतोल ढासळला. या निवडणुकीत 79 अपक्ष उमेदवार असले तरी त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक बंडखोर हे राजे गटातील आहेत. याच बंडखोरीचा फटका भाजपकडून उभ्या राहिलेल्या अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.
सातारा पालिकेसाठी तणावपूर्ण वातावरणात मतदान झाले असले तरी त्यानंतर कोणकोणत्या प्रभागात क्रॉसव्होटिंग झाले, कुणी कुणाला गुप्तपणे साथ दिली, कुठे पाडापाडीचे व जिरवाजिरवीचे राजकारण झाले, कुठल्या प्रभागात बंडखोर प्रबळ ठरले आणि त्यांचा फटका भाजपच्या अधिकृत उमेदवारांना बसला याची जोरदार चर्चा सातार्यात सुरु झाली आहे. भाजपकडून पॅनेल टू पॅनेल मतदान करायचे असे आदेश देण्यात आले होते.
मात्र याच्या उलट झाले. प्रभागात व्यक्तीगत मतदान करुन घेण्याकडे कल राहिला. नगरसेवकपदासाठी एकाच प्रभागात भाजप अंतर्गत दोन्ही राजे गटाचे उमेदवार असतानाही त्याठिकाणी मनभेद असल्याचे दिसून आले. त्याचा फटका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनाही बसला असण्याची दाट शक्यता आहे.
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या प्रमुख लढतीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातच लढत झाली. इतर उमेदवारांनीही अपापल्या ताकदीप्रमाणे टक्कर देण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा भाजपाचा उमेदवार निवडून येईल, अशी शक्यता आहे, पण मताधिक्क्य मात्र लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. राजे गटातून उफाळलेली बंडखोरी व यातील बहुतांश बंडखोरांनी नगरसेवकपदासाठी आम्हाला मदत करा, नगराध्यक्षपदासाठी तुम्ही कुणालाही मतदान करा, अशी विनंती मतदारांना केल्यानेही परिणामी मताधिक्क्य घटणार आहे.
त्यातच यावर्षी झालेल्या निवडणुकीत खा. उदयनराजेंची सातारा विकास आघाडी आणि ना. शिवेंद्रराजेंची नगर विकास आघाडी नव्हती. आघाड्यांऐवजी भाजपच्या माध्यमातून दोन्ही राजे एकत्र निवडणुकीला सामोरे गेले. पारंपरिकपणे आघाड्यांना मतदान करणार्या मतदारांमध्ये फाटाफूट झाली. आघाड्यांच्या चिन्हांऐवजी पक्षचिन्ह असल्यामुळे त्याचाही परिणाम नगराध्यक्ष मताधिक्क्यावर होण्याची शक्यता आहे.
उदयनराजे प्रचारात न दिसल्याने निर्माण केलेली संभ्रमावस्था याचाही काही प्रमाणात परिणाम झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सातारा शहरात अपेक्षित ताकद नसली तरी लक्षणीय मते या गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पडण्याची शक्याता नागरिकांच्या चर्चेतून व्यक्त होत आहे.