

सातारा : साताऱ्यातील एमआयडीसी येथे मंगळवारी सायंकाळी ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात ओंकार जयवंत गवळी (वय 20, रा. भोसले कॉलनी, कोडोली, सातारा) हा युवक ठार झाला. ओंकारचा मित्र प्रथमेश माने जखमी झाला आहे. अनोळखी ट्रकची धडक बसल्यानंतर तो ट्रक थांबला नाही.
सातारा शहर पोलिस ठाण्यात अनोळखी ट्रक व त्यावरील चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रथमेश प्रशांत माने (वय 20, रा. कोडोली) या युवकाने तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ओंकार गवळी व प्रथमेश माने हे दोघे मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरुन निघाले होते. नवीन एमआयडीसी येथील परफेक्ट कंपनीसमोर दुचाकी आली असता अनोळखी ट्रकची त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक बसली. अपघातात प्रथमेश याच्या कपाळाला व छातीला मार लागला. तर ओंकार गवळी याच्या तोंडावरुन ट्रकचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र ओंकारचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अपघाताची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन अज्ञात ट्रक चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस ट्रकचा शोध घेत आहेत. ओंकार गवळी यांच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.