

भुईंज : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भुईंज, ता. वाई येथील बदेवाडी हद्दीत दगडे वस्ती येथे मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास शेडला अचानक आग लागण्याची घटना घडली. या आगीत शेडमध्ये साठवून ठेवलेल्या ट्रकभर जळणाने पेट घेतल्याने आग रौद्ररूपात पसरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दगडे वस्ती येथील सोमेश्वर सुतार हे शेतकरी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी आंघोळीसाठी चूल पेटवली होती. चूल पेटवून ते काही काळासाठी दुसरीकडे गेले असता, चुलीजवळ साठवलेल्या लाकडांनी पेट घ्यायला सुरुवात केली. काही क्षणातच शेडमध्ये साठवून ठेवलेल्या ट्रकभर जळणाला आग लागली. आग वेगाने पसरून शेजारील फॅक्टरीपर्यंत पोहोचली. या आगीत फॅक्टरीचे मालक सागर सुतार यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच शैलेश भोसले, अंकुश शिंदे, बाळू पवार, मदन शिंदे, राहुल शेवते, शशिकांत दगडे यांच्यासह बदेवाडीतील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या नुकसानीचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी मोहन जाधव व महसूल सेवक महेश सुतार यांनी केला. दरम्यान, आगीच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.