

सातारा : सातार्यात रिक्षा चालकांचा मनमानी कारभार दै.‘पुढारी’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर बुधवारी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत रिक्षा चालकांची झाडाझडती घेतली. 60 हून अधिक रिक्षांची तपासणी केली असता, त्यापैकी 19 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सातारा शहर परिसरात नागरिकांच्या रिक्षा चालकांबाबत अनेक तक्रारी होत्या. मनमानी भाडे आकारणीमुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. बुधवारी सकाळी आरटीओ व सातारा शहर वाहतूकचे पोलिस एकत्र येत एसटी स्टॅन्ड परिसरात जमले.
रिक्षा चालकांना थांबवून कागदपत्रांची तपासणी करण्याची मोहीम उघडण्यात आली. सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत पोलिसांनी सुमारे 60 हून अधिक रिक्षा चालकांना थांबवून कागदपत्रांची तपासणी केली. आरटीओ व वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या या संयुक्त कारवाईमध्ये 19 रिक्षा चालकांकडे कागदपत्रांची पूर्तता नव्हती.
यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये आरटीओ विभागाने 355 वाहने तपासली असता, त्यापैकी 92 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 1 लाख 52 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.