

सातारा : देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांचे स्मरण कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनात राहिले पाहिजे. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण सुरक्षित आणि सुखरुप आहोत. लष्कर, हवाई दल आणि नौदलातील जवानांच्या योगदानाची जाणीव नव्या पिढीला व्हावी, तसेच तरुणांमध्ये देशसेवेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने एअर शोचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.
सैनिक स्कूल मैदानावर भारतीय वायू दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टिमचा एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा. उदयनराजे म्हणाले, देशाच्या संरक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या आणि शहीद झालेल्या जवानांची आठवण केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी राहिली पाहिजे. आज आपण सुरक्षित जीवन जगत आहोत, ते सीमेवर आणि देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या जवानांमुळेच.
लष्कर, हवाई दल आणि नौदलातील प्रत्येक अधिकारी व जवानाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्याबद्दल समाजात कृतज्ञतेची भावना असली पाहिजे. या एअर शोच्या आयोजनामागे तरुण पिढीला संरक्षण दलांचे कार्य जवळून समजावे, हा प्रमुख हेतू आहे. आजचे लहान विद्यार्थी आणि तरुण उद्या देशाचे जबाबदार नागरिक होणार आहेत. त्यांनीही भविष्यात समाज आणि देशासाठी योगदान देण्याची प्रेरणा घ्यावी. या उपक्रमाच्या नियोजनासाठी एअरफोर्सचे अधिकारी, संरक्षण दलातील पदाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांचे तसेच आयोजनात योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. तसेच एअर शो हा नागरिकांसाठी विशेषतः तरुणांसाठी पाहण्यासारखा अनुभव असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे देशाच्या संरक्षण दलांविषयी अभिमान आणि आदराची भावना अधिक दृढ होणार आहे असेही उदयनराजे म्हणाले.